पुणे रेल्वे स्थानकावरील विद्युत पुरवठा दोन तास खंडीत; पाच रेल्वे धावल्या उशीराने
By नितीश गोवंडे | Published: August 27, 2022 06:59 PM2022-08-27T18:59:58+5:302022-08-27T19:00:28+5:30
काही गाड्या पुणे स्थानकावर अडकून पडल्या होत्या...
पुणे :पुणे रेल्वे स्थानकावरील विद्युत पुरवठा खंडीत झाला आणि एकच गोंधळ उडाला. अनेक प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी उशीर तर झालाच पण पायपीट देखील करावी लागली. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास खंडीत झालेला विद्युत पुरवठा नऊच्या सुमारास पुर्ववत झाला. या दोन तासाच्या दरम्यान पाच रेल्वे उशीराने धावल्या. त्यामुळे काही गाड्या शिवाजी नगर ते पुणे स्थानकादरम्यान उभ्या होत्या, तर काही गाड्या पुणे स्थानकावर अडकून पडल्या होत्या.
मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी ओव्हरहेड इक्वीपमेंट (ओएचइ) ट्रीप झाल्याने सकाळी सात ते नऊ या वेळेत विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे पाच गाड्यांना सुमारे दीड तास उशीर झाला. सकाळी सव्वासात वाजता सुटणारी पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस पुणे स्थानकातून सव्वानऊ वाजता सुटली. यामुळे पुण्याहून मुंबईला कामानिमित्त प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना कामावर पोहोचण्यास उशीर झाला. या घटनेमुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर टीका करत चमकोगिरी करण्यापेक्षा योग्य काम करण्यावर भर देणे गरणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस आणि पुणे-लोणावळा लोकल या रेल्वे पुणे स्थानकातच उभ्या होत्या. तर सिंकदराबाद-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस आणि तिरूचिरापल्ली-गंगापल्ली हमसफर एक्स्प्रेस या रेल्वे शिवाजी नगर आणि पुणे स्थानकादरम्यान मध्येच अडकल्या होत्या. या दोन्ही गाड्या स्थानकावर न पोहोचल्याने यातील प्रवाशांनी मध्येच उतरून रेल्वे रूळावरून चालत स्थानक गाठले आणि निश्चित स्थळी प्रवास केला.
ओएचइ ट्रीप झाल्याने एक ते दीड तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रेल्वे प्रशासनाने तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करून विद्युत पुरवठा पूर्ववत केला. यामुळे पाच रेल्वे उशीराने धावल्या, पण दरम्यानच्या काळात डिझेलवर चालणाऱ्या गाड्या सुरू होत्या.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे
मी डेक्कन क्वीनने मुंबईला जाण्यासाठी सकाळी रेल्वे स्थानकावर आले होते. त्यावेळी स्थानकातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे समजले. त्यामुळे प्रवाशांची प्रंचड गैरसोय झाली होती. याआधी देखील अनेकदा असे प्रकार झाले आहेत. नेहमी गर्दीच्या वेळी विद्युत पुरवठा कसा खंडित होतो ही विचार करण्याची बाब आहे.
- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवाशी मंच