वीजबिल थकल्याने उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाचा विद्युतपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:09 AM2021-03-24T04:09:53+5:302021-03-24T04:09:53+5:30
भोर : उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने मागील एक वर्षापासून थकलेले सुमारे २२ हजार ३० रुपये बिल न भरल्याने वीज ...
भोर :
उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने मागील एक वर्षापासून थकलेले सुमारे २२ हजार ३० रुपये बिल न भरल्याने वीज वितरण कंपनीने १८ मार्चपासून वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे विजेअभावी आॅनलाइन व्यवहार बंद असून कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची कामे मागील सहा दिवसांपासून रखडत असल्यामुळे नागरिक कार्यालयाच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.
भोर शहरातील वेताळ पेठ येथील भूमिअभिलेख कार्यालयातील वीजबिलाची १८९७१ हजार रुपये मागील एक वर्षाची थकबाकी असून, चालूचे ३०५९ असे एकूण २२०३० रुपये वीजबिल मागील १४ महिन्यांपासून थकलेले आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने गुरुवारी १८ मार्चला उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
मोजणी अर्ज, नगरभूमापन, क प्रत निकाली काढणे, अर्ज टायपिंग करणे यांच्यासह आॅनलाइन सर्व व्यवहार बंद पडले आहेत. त्यामुळे कार्यालय मागील सहा दिवसांपासून अंधारात आहे. वीजपुरवठा बंद असल्याने कार्यालयातील संगणक किंवा लॅपटाॅप चालत नाहीत. पंखे दिवे बंद आहेत. यामुळे कार्यालयीन कामकाजच ठप्प झाले.
भूमिअभिलेख कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या लोकांची अनेक कामे होत नाहीत. त्यांना परत जावे लागत असल्यामुळे ते नाराजी व्यक्त करीत आहेत. उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडून १४ महिन्यांचे वीजबिल भरलेले नाही. त्यांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून याचा लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे लवकरात लवकर पैसे भरुन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरीक करत आहेत.
उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय फोटो