प्रभागरचना, आरक्षणाची उत्सुकता शिगेला
By Admin | Published: October 7, 2016 03:06 AM2016-10-07T03:06:18+5:302016-10-07T03:06:18+5:30
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या बहुचर्चित ४ सदस्यीय प्रभागरचनेवरचा पडदा उद्या (शुक्रवारी) उठणार असून, गणेश कला क्रीड मंदिर सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता प्र
पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या बहुचर्चित ४ सदस्यीय प्रभागरचनेवरचा पडदा उद्या (शुक्रवारी) उठणार असून, गणेश कला क्रीड मंदिर सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता प्रभागांच्या आरक्षणांची सोडत काढली जाणार आहे. नवा प्रभाग कसा असणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
प्रभाग नेमका कसा असेल याचे वेगवेगळे अंदाज इच्छुक उमेदवारांकडून लढविले गेले. ती प्रभागरचनाच महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून आज जाहीर केली जाणार आहे. चार सदस्यांच्या प्रभागातील जागांचे नामकरण १ अ, १ ब, १ क व १ ड असे करण्यात आले आहे. या प्रभाग रचनेसाठी २०११ची जनगणना लोकसंख्या प्रमाणित धरण्यात आली आहे. प्रत्येकी ४ सदस्यांचे ३९ प्रभाग व प्रत्येकी ३ सदस्यांचे २ प्रभाग अशा एकूण ४१ प्रभागांचे नकाशे या वेळी जाहीर करण्यात येणार आहेत.
प्रभागातील एकूण चार सदस्यांपैकी २ सदस्य महिला असतील. तीन सदस्यांच्या प्रभागात असे करता येणार नसल्यामुळे तिथे त्यातील एका प्रभागात दोन महिला सदस्य असतील व दुसऱ्यात एकच महिला सदस्य असेल. याप्रमाणे त्या सहा सदस्यांपैकी ३ महिला व ३ पुरुष सदस्य असणार आहेत.
आरक्षण निश्चित करताना प्रत्येक प्रभागात उपलब्ध असलेली पहिली जागा ही त्या त्या प्रवर्गाकरिता आरक्षित होईल. प्रभाग क्रमांक १ ते ४१ छापील चिठ्ठ्या काढण्यात येणार आहेत. या चिठ्ठ्या एका पारदर्शक ड्रममध्ये टाकून शालेय विद्यार्थ्याच्या हातून ड्रम फिरवून त्यातून चिठ्ठी काढली जाईल. आरक्षण निश्चित करताना प्रत्येक प्रभागात उपलब्ध असलेली पहिली जागा ही त्या-त्या प्रवर्गाकरिता आरक्षित होईल. उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक ५ व १७ हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार अनुसूचित जातींसाठी राखीव होत असल्यास त्यातील जागा क्रमांक ५ अ व १७ अ अनुसूचित जातींकरिता राखीव होतील. याच पद्धतीने सर्व राखीव गटांची सोडत काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
अशा असणार आरक्षित जागा
महापालिकेच्या एकूण १६२ जागांपैकी अनुसूचित जातींसाठी (एससी) एकूण २२ जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यातील ११ जागा त्या गटाच्या महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जमातीसाठी (एसटी) २ जागा राखीव असून, त्यातील १ जागा महिलांसाठी राखीव असेल. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) एकूण ४४ जागा असून, त्यातील २२ महिलांसाठी असतील व उर्वरित ९४ जागा सर्वसाधारण असतील. त्यातील ४७ महिलांसाठी राखीव असतील.
हरकती १० ते २५ आॅक्टोबरपर्यंत नोंदविता येणार
1निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार प्रभागरचनेचा आराखडा तयार झाला नसल्यास त्याबाबत १० ते २५ आॅक्टोबर पर्यंत हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत.
2त्या हरकती महापालिकेची मुख्य इमारत, सावरकर भवन येथील निवडणूक कार्यालय व सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नोंदविता येणार आहेत. हरकतींवर ४ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेतली जाणार आहे.