दारूबंदीसाठी बचत गटाच्या महिला करणार प्रबोधन
By admin | Published: March 15, 2016 03:59 AM2016-03-15T03:59:06+5:302016-03-15T03:59:06+5:30
आता गावागावांत जाऊन महिला बचत गटाच्या सदस्य दारूबंदीसाठी प्रबोधन करणार आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणने व्यसनमुक्तीची नावीन्यपूर्ण योजना हाती घेतली असून, तिला जिल्हा
पुणे : आता गावागावांत जाऊन महिला बचत गटाच्या सदस्य दारूबंदीसाठी प्रबोधन करणार आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणने व्यसनमुक्तीची नावीन्यपूर्ण योजना हाती घेतली असून, तिला जिल्हा नियोजनेने मान्यता दिली असल्याचे प्रकल्पप्रमुख दिनेश ढोके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. गावात महिलांनी एकत्र येऊन दारूबंदी केली, तरी तिला यश येत नाही. याचे कारण मानसिकता. ही मानसिकता बदलण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागात गरीब कुटुंबांना दारिद्र्याच्या बाहेर येण्यासाठी मोठा अडसर ठरतो तो व्यवसनाधीनता. प्रबोधन, समुपदेशन या मार्गाने अनेकांनी व्यसने सोडल्याची उदाहरणे आहेत. व्यवसानांचे गांभीर्य व दुष्परिणाम, याची माहिती पटवून दिली तर व्यसन सुटू शकते. त्यामुळे महिला बचत गटाच्या व जिल्हा नियोजनच्या माध्यमातून ही योजना राबविण्याचे ठरविण्यात आले. तसा प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे दिल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी तिचे स्वागत करून तिला मंजुरी दिली आहे. यासाठी आता स्वयंसेवक प्रशिक्षण कायक्रम घेतला असून, १३० जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)
या १३० स्वयंसेवकांना तज्ज्ञांमर्फत मार्गर्शन करून ग्रामस्थांची मानसिकता कशी बदलायची, हे शिकविणार आहेत. १७ ते २८ मार्चदरम्यान हे प्रशिक्षण होणार असून, हे प्रशिक्षीत गावागावांत महिला बचत गटांना बरोबर घेऊन दारूबंदी करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.