Raj Thackeray: पुणे राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंना 'या' महापुरुषांच्या पुस्तकांचा संच भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 09:08 PM2022-04-13T21:08:52+5:302022-04-13T21:09:09+5:30
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत इतिहास माहिती नसताना बेलगाम वक्तव्ये केली होती
पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत इतिहास माहिती नसताना बेलगाम वक्तव्ये केली. त्यांना महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास आणि सौहार्द समजावे यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने त्यांचे प्रबोधन करण्याचे ठरविले आहे. यासाठी राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे, महात्मा फुले, शरद पवार आणि गोविंद पानसरे यांची पुस्तके भेट म्हणून पाठविण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिटी पोस्ट येथून टपालाद्वारे पुस्तकांचा संच राज ठाकरे यांना पाठविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख , किशोर कांबळे,अजिंक्य पालकर, मनोज पाचपुते, रोहन पायगुडे, मंगेश मोरे, आनंद सागरे, गजानन लोंढे,निलेश वाघमारे, देवा व्हाल्लेकरआदी उपस्थित होते.
याबाबतची भूमिका मांडताना देशमुख म्हणाले, राज ठाकरे यांना महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाची पुरेशी माहिती नाही असे त्यांच्या ठाण्यातील भाषणातून दिसून आले. वा प्रबोधकार ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या नेत्याचा इतिहास इतका कच्चा असू शकतो हे पुन्हा कळाले. आपल्याच ज्ञाती बांधवांचं जागरण करावं, त्यांना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांच्यातल्या काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्यालाही दूर लोटावं, या पद्धतीनं प्रबोधनकार ठाकरे ‘प्रबोधन’ हे पत्र चालवलं. मात्र, राज ठाकरे ते विसरून धर्मांध पक्षांच्या नादी लागून महाराष्ट्राच्या सौहार्दाच्या संस्कृतीवर हल्ला करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या विचारांचा वारसा तरी राज ठाकरे यांना चालवावा यासाठी त्यांच्या ज्ञानवर्धनाकरिता समग्र प्रबोधनकार ठाकरे, महात्मा फुले यांचे ‘गुलामगिरी’, गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?‘ आणि शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती’ तसेच गुजराथ फाईल्स ही पुस्तके पाठविली आहेत.