परीक्षा झालेल्या नसताना मागविले प्रॅक्टिकलचे गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:09 AM2021-04-27T04:09:34+5:302021-04-27T04:09:34+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांकडून येत्या ३० एप्रिलपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण मागविले आहेत. ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांकडून येत्या ३० एप्रिलपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण मागविले आहेत. विद्यापीठाने प्राचार्यांना याबाबत ई-मेल पाठविला आहे. मात्र, प्रॅक्टिकल परीक्षाच झालेल्या नसताना गुण कसे द्यायचे ? असा प्रश्न महाविद्यालयांकडून उपस्थित केला जात आहे. तर विद्यापीठाने केवळ अंतर्गत परीक्षांचे गुण मागविले आहेत. प्रात्यक्षिक परीक्षांचे नाही, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे वर्षभरापासून महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेता आल्या नाहीत. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या पहिल्या सत्राची परीक्षा सुरू आहे. आणखी काही दिवस चालणार आहे. त्यातच कोरोनामुळे वर्ष संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण विद्यापीठाने महाविद्यालयांकडून घ्यावेत, असा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला तरीही विद्यापीठाने महाविद्यालयांना असा ई-मेल का पाठवला, यावरून गोंधळ निर्माण झाला आहे.
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण ऑनलाइन पद्धतीने भरून द्यावेत,अशा सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत. त्यानुसार बहुतेक महाविद्यालयांनी ऑनलाइन पद्धतीने गुण भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु, कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेणे शक्य झाले नाही. तसेच येत्या ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेता येणार नाहीत. तरीही विद्यापीठाने ३० एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे गुण मागविल्याने महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
---
प्रात्यक्षिक परीक्षा झालेल्या नसताना विद्यापीठाने या परीक्षांचे गुण मागविणे चुकीचे आहे. तसेच महाविद्यालयांकडून वर्षाअखेरीस प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण घ्यावेत, असा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत झालेला असताना त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पुन्हा परीक्षा मंडळाची बैठक बोलावावी, अशी आग्रही मागणी मी विद्यापीठाकडे करणार आहे.
- डॉ. संजय चाकणे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
--
प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण पाठविण्यास संदर्भात विद्यापीठाने पाठविलेल्या पत्रामुळे महाविद्यालयांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे अनेकांना प्रात्यक्षिक परीक्षा घेता आल्या नाहीत. काही निवडक महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या म्हणजे सर्वांनी घेतल्या, असा अर्थ काढता येत नाही. त्यामुळे विद्यापीठाने या पत्राच्या पुनर्विचार करावा.
- डॉ. संजय खरात, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, गणेश खिंड
--
विद्यापीठाने महाविद्यालयांकडून केवळ अंतर्गत परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने मागविले आहेत. प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण महाविद्यालयांकडून मागविले नाहीत. प्रात्यक्षिक परीक्षांच्या गुणांची लिंक सुद्धा बंद ठेवण्यात आलेली आहे.
- महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ