बाँडवर लिहून देत प्रॅक्टिस! ‘ती’ महिला बोगस डॉक्टर मोकाटच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 10:17 AM2023-11-09T10:17:08+5:302023-11-09T10:17:18+5:30

गुन्हा दाखल होऊन महिना उलटला तरी अजूनही पोलिसांनी अशा गंभीर प्रकरणातील आरोपी महिलेला अटक केली नाही

Practice writing on bonds That female bogus doctor Mokatch | बाँडवर लिहून देत प्रॅक्टिस! ‘ती’ महिला बोगस डॉक्टर मोकाटच

बाँडवर लिहून देत प्रॅक्टिस! ‘ती’ महिला बोगस डॉक्टर मोकाटच

पुणे : गेली अनेक वर्षांपासून शहरातील विविध रुग्णालयांमध्ये एक महिला डॉक्टर म्हणून ती कार्यरत होती. डॉक्टर असल्याचे सांगूनच तिने लग्नदेखील केले. मात्र, पुणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘ती’च्या विरोधात बोगस वैद्यकीय अधिकारी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्यात ११ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होऊन महिना उलटला तरी अजूनही पोलिसांनी अशा गंभीर प्रकरणातील आरोपी महिलेला अटक न केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

चैताली सुनील बागूल (रा. सह्याद्री को-ऑप. सोसायटी, टिटवाळा पूर्व, मुंबई) असे बोगस डॉक्टर म्हणून पुण्यासह नाशिक आणि मुंबई येथे काम केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात पुणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती घनवट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चैताली बागूल हिने पुण्यातील इंदिरा आयव्हीएफ, जीवनज्योत हॉस्पिटल आणि श्री हॉस्पिटल या तीन रुग्णालयांमध्ये डॉक्टरकीची (बीएचएमएस) कोणतीही पदवी नसताना वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले होते. १४ जुलै रोजी प्रथमेश मकरंद पवार यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज केला होता. या तक्रारी अर्जाच्या पडताळणीमध्ये चैताली बागूल ही महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीच्या पत्रानुसार ती कुठेही वैद्यकीय व्यवसाय करताना आढळली तर तिच्यावर त्वरित फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे पत्रदेखील होते.
यानंतर फिर्यादी डॉ. घनवट यांनी चैताली बागूल ज्या रुग्णालयांमध्ये काम करत होती, तेथे जाऊन विचारणा केली असता संबंधित रुग्णालयामध्ये ती आता कार्यरत नसल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी यांनी महापालिकेच्या विधि अधिकाऱ्यांना दिली असता, त्यांनी चैताली बागूल हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा अभिप्राय दिल्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉक्टर असल्याचे सांगत केले लग्न

दरम्यानच्या काळात चैताली बागूल हिने स्वत: डॉक्टर असल्याचे सांगत, एका नामवंत डॉक्टरशी लग्नदेखील केले. लग्नानंतर मुलासह त्यांच्या घरात सगळ्यांना ही बोगस डॉक्टर असल्याचे समजले. त्यामुळे चैताली सध्या डॉक्टर नवऱ्यापासून विभक्त राहत असून, अशा प्रकारे फसवणूक करणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे मतदेखील डॉक्टर मुलाच्या नातेवाइकांनी व्यक्त केले.

बॉण्ड पेपरवर लिहून द्यायची..

चैताली बागूल हिने ज्या-ज्या रुग्णालयांत काम केले तिथे तिला वैद्यकीय प्रमाणपत्राबद्दल विचारणा केली जायची. त्यामुळे ती चार ते पाच महिनेच एखाद्या रुग्णालयात काम करायची. तसेच, सुरुवातील वैद्यकीय प्रमाणपत्र गावी आहे, असे सांगून तोपर्यंत बॉण्ड पेपरवर लिहून देत ती काही काळ नोकरी करायची, अशी माहितीदेखील समोर आली आहे.

अद्याप अटक नाही

बोगस महिला डॉक्टर चैताली बागूल ही केवळ १२वी उत्तीर्ण आहे. तिच्यावर गुन्हा दाखल होऊन आज महिना उलटला. ती सध्या मुंबईत राहत असून, सर्वत्र अजूनही डॉक्टर म्हणूनच वावरत असल्याची माहिती तिच्या सासरच्या लोकांनी दिली. मात्र, विमानतळ पोलिसांनी सगळे पुरावे असतानादेखील, एवढ्या गंभीर प्रकरणातील आरोपीला अजूनही अटक का केली नाही, असा सवालदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

 

 

 

 

Web Title: Practice writing on bonds That female bogus doctor Mokatch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.