प्रदीप कोडीतकर ‘उरुळी कांचन केसरी’
By admin | Published: March 21, 2017 05:03 AM2017-03-21T05:03:07+5:302017-03-21T05:03:07+5:30
येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ यात्रा उत्साहात साजरी होताना झालेल्या कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात कोल्हापूर येथील मोतीबाग
उरुळी कांचन : येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ यात्रा उत्साहात साजरी होताना झालेल्या कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात कोल्हापूर येथील मोतीबाग तालमीचा पैलवान प्रदीप कोडीतकर याने ‘उरुळी कांचन केसरी २०१७’साठी असलेली चांदीची गदा व रोख ५१ हजारांचे इनाम जिंकले.
यात्रेमधील महत्त्वाचे आकर्षण असलेल्या कुस्ती आखाड्यासाठी विविध ठिकाणांहून सुमारे ९० मल्ल सहभागी झाले होते, तर पंच म्हणून माजी उपसरपंच दत्तात्रय बाजीराव कांचन, युवराज कांचन, प्रकाश कांचन यांनी चोख कामगिरी बजावली. मानाची कुस्ती दिल्ली येथील पैलवान मनोज कुमार व जावजीबुवाचीवाडी (ता. दौंड) येथील व कोल्हापूर येथील मोतीबाग तालमीचा पैलवान प्रदीप कोडीतकर यांच्यात झाली. या कुस्तीत कोडीतकर याने मनोजकुमारवर बाजी मारत उरुळी कांचन केसरी २०१७ चा किताब पटकावला.
कोडीतकर याला काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने ५१ हजार रुपये रोख व कै. धनंजय गुलाबराव कांचन यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा बक्षीस म्हणून देण्यात आली. काळभैरवनाथ यात्रेची सांगता ‘ती फुलराणी’ या नाटकाने व मनमोहक अशा दारूकामाच्या आतषबाजीने झाली. या वेळी भैरवनाथ सेवा समितीचे पदाधिकारी तसेच उत्सव समिती कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.