प्रदीप कुरुलकरने DRDO च्या क्षेपणास्त्रांची माहिती चॅट, मेलद्वारे पाकिस्तानी हेराला पुरविली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 01:20 PM2023-07-08T13:20:26+5:302023-07-08T13:22:57+5:30
डॉ. कुरूलकर याला डीआरडीओची गोपनीय आणि संवेदनशील माहिती अधिकृत मोबाइल क्रमाकांवरून देणे शक्य नव्हते. म्हणून त्याने दुसरा मोबाइल खरेदी केला...
पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या ब्रम्होस, अग्नी 6, मिसाइल लाँचर, इमेटॉर रफेल, एमबीडीए अशा विविध क्षेपणास्त्रांसह रुस्तम, सरफेज टू एअर मिसाइल, क्वाडेटर, इंडियन निकुंज पराशर ही प्रोजेक्ट व डीआरडीओचे ड्यूटी चँट या सर्वांची माहिती डीआरडीओचा संचालक डॉ. प्रदीप कुरूलकर याने पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ता हिला व्हॉटस्अप, इन्स्ट्राग्राम आणि मेलद्वारे पुरविली अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासातून समोर आली आहे.
कुरूलकरने डीआरडीओच्या संशोधन आणि विकास विभागाच्या सुरक्षा नियमावलीसंदर्भातील मयूरपंख प्रणालीचा भंग (आर अँड डी) केला. शत्रू राष्ट्राला याची माहिती मिळाल्यास देशाच्या सुरक्षा व सार्वभौत्वाला धोका निर्माण होऊ शकतो, असा ठपका कुरूलकरवर दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे.
डॉ. कुरूलकर याला डीआरडीओची गोपनीय आणि संवेदनशील माहिती अधिकृत मोबाइल क्रमाकांवरून देणे शक्य नव्हते. म्हणून त्याने दुसरा मोबाइल खरेदी केला. त्या खाजगी मोबाइलमध्ये त्याने सर्व प्रोजेक्टची माहिती, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन घेतले. झारा दासगुप्ता हिने कुरूलकरशी संबंध वाढविला. अग्नी 6, ब्राह्मोस याची माहिती बिंगो चँटडॉट नेट आणि क्लाउड चँटडॉट नेटवर डाउनलोड करण्यास तिने सांगितले आणि त्याच्या व्हिडीओ क्लिप फॉरवर्ड करण्यास सांगितल्या. राष्ट्रीय सुरक्षा नियमांचा भंग करून अधिकार व पदाचा गैरवापर करून ही माहिती कुरूलकरने हस्तांतरित केल्याचे समोर आले. त्यामुळे कुरूलकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एटीएसने दोषारोपपत्रात उल्लेख केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, सरकारी पक्षाने कुरूलकर याची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणी करण्याच्या मागणीसंदर्भात शुक्रवारी सुनावणी झाली. बचाव पक्षाने चाचणीला विरोध करीत त्यासंबंधी न्यायालयात अर्ज सादर केला. त्यावर न्यायालयाने सरकारी पक्षाला चाचणीच्या आवश्यकतेसंदर्भात उत्तर देण्यासाठी सरकारी पक्षाला दि.२१ जुलैची तारीख दिली आहे.