साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप निंबाळकरांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 06:05 PM2018-11-05T18:05:26+5:302018-11-05T18:42:28+5:30
इंदापूरमध्ये प्रदीप निंबाळकर यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
भवानीनगर (ता. इंदापूर) येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप केशवराव निंबाळकर (वय ४५) यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ३१ आॅक्टोबरला निंबाळकर यांची छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.
निंबाळकर यांना गंभीर जखमी आवस्थेत बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेचे वृत्त समजताच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. दरम्यान, निंबाळकर राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर होते. तिथेच ही घटना घडली. अचानक गोळीच्या आवाज आल्याने घरातील सदस्यांनी जाऊन पाहिले, त्यावेळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर तातडीने त्यांना बारामतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. ऐन दिवाळीमध्येच निंबाळकर यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने सणसर गावावर शोककळा पसरली आहे. निंबाळकर यांचा मृतदेह रूई येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.