एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक रूटवर मुंबईतील ट्रेकर डॉ. प्रज्ञा सावंत आणि नारायण अय्यर यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 11:59 AM2022-05-07T11:59:16+5:302022-05-07T12:00:16+5:30
या दोन घटनांमुळे महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे
पुणे : कांचनजुंगा (सुमारे ८,२०० मीटर) या प्रचंड शिखरावर महाराष्ट्रातील गिर्यारोहक नारायण अय्यर (वय ५२) यांचा निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि उंचीच्या आजारामुळे गुरुवारी मृत्यू झाला. कॅम्प ४ सोडल्यानंतर काही वेळातच आजारी वाटूनही त्याने शिखर गाठण्याचा निर्धार केला होता. तर दुसऱ्या एका मोहिमेत गोक्यो येथे एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक रूटवर मुंबईतील ट्रेकर डॉ. प्रज्ञा सावंत यांचा शुक्रवारी एक मृत्यू झाला. सावंत यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या दोन घटनांमुळे महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील नारायणन अय्यर यांनी जगातील तिसऱ्या सर्वोच्च शिखराच्या शिखर बिंदूकडे जाताना ८,२०० मीटरवर गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. ५२ वर्षीय गिर्यारोहकाने गिर्यारोहण संपवताना आजारी पडल्यानंतरही खाली उतरण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. गिर्यारोहक मार्गदर्शकाने गिर्यारोहकाला वारंवार खाली उतरण्यास सांगितले पण अय्यरने त्यांच्या आवाहनाला नकार दिल्याचा शेर्पाने दावा केला आहे. पर्वतारोहण करणारे इतर गिर्यारोहक आता कॅम्पवरून बेस कॅम्पवर उतरत आहेत.
वाटेतच प्राणजोत मालवली
पृथ्वीवरील तिसऱ्या सर्वात उंच पर्वत आणि भारतातील सर्वात उंच पर्वत पुण्यातील मुळशी तालुक्यातील भगवान चवले आणि नारायणन अय्यर यांनी गुरुवारी (दि. ५) रोजी सायंकाळी ४.५२ वाजता कांचनजंगा शिखर (८५८६ मीटर) यशस्वीपणे सर केले होते. या टीमला खाली उतरण्यासाठी अजून किमान ६ तास लागणार होते. मात्र, वाटेतच नारायण अय्यर यांची प्राणजोत मालवली.
कांचनजुंगा शिखर चढाई करताना नारायणन यांचा झालेला मृत्यू अतिशय धक्कादायक व दुखःद आहे. अष्टहजारी शिखरांमध्ये चढाईच्या दृष्टीने कांचनजुंगा हे शिखर अतिशय खडतर व आव्हानात्मक आहे. येथील कॅम्प ४ ते शिखरमाथा ही चढाई तुलनेने मोठी आहे. त्यामुळे येथील आव्हानांमध्ये अधिक भर पडते. आशा खडतर शिखरांवर चढाई करताना शिस्तबद्ध तयारी सोबतच डेथ झोन सारख्या ठिकाणी नेमकं कुठं थांबलं पाहिजे याची योग्य जाण असणं गरजेचं ठरतं. शुक्रवारी नारायणन यांच्या दुःखद बातमी सोबतच एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकवर डॉ. प्रज्ञा सावंत यांच्या मृत्यूची बातमी देखील आली. या दोन्ही घटना मनाला चटका लावून जाणाऱ्या आहेत. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे मी दोन्ही गिर्यारोहकांच्या मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करतो.
- उमेश झिरपे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ