‘एचपीसीएल’साठी प्राज उभारणार कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:11 AM2021-03-19T04:11:54+5:302021-03-19T04:11:54+5:30
पुणे : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (एचपीसीएल) उत्तर प्रदेशातील बदायु येथे प्राज उद्योगसमूहातर्फे कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्रकल्पाची उभारणी केली ...
पुणे : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (एचपीसीएल) उत्तर प्रदेशातील बदायु येथे प्राज उद्योगसमूहातर्फे कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. तांदळाच्या पेंढ्यापासून सीबीजी तयार करण्यासाठी प्राजने स्वतः विकसित केलेले जागतिक स्तरावर प्रथमच वापरले जाणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान यासाठी वापरले जाणार आहे.
वर्षाला ५ हजार २५० टन सीबीजी उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून ३५ हजार टन तांदळाच्या पेंढ्यावर प्रक्रिया
करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. याव्यतिरिक्त, या प्रकल्पातून २३ हजार टन उच्च प्रतीचे घन जैवखत तर
साडेतीन लाख टन द्रव जैवखत तयार होणार असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकल्पात प्रतिवर्ष १५ हजार मेट्रिक टन
कार्बन उत्सर्जन कमी करण्याची क्षमता असून येत्या वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित होईल.
सीबीजीला पर्यायी, हरित परिवहन इंधन म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रकल्प पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
मंत्रालय, भारत सरकारच्या विशेष उपक्रमात योगदान देणारा असून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळेल, असे प्राजने म्हटले आहे. प्राज इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर
जोशीपुरा म्हणाले की, हा प्रकल्प शेतीतील कचरा जाळण्यामुळे निर्माण होणाऱ्या
वायू प्रदूषणाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी एक उपाय आहे.