भंडारा -गोंदियामधील मशीन बंद पाडण्यासाठी राज्यशासन आणि निवडणूक आयोगाचे संगनमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 03:35 PM2018-05-28T15:35:15+5:302018-05-28T15:35:15+5:30
निवडणूक आयोग, राज्यशासन आणि यंत्रण यांनी संगनमताने भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद पाडल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.
पुणे : निवडणूक आयोग, राज्यशासन आणि यंत्रणा यांनी संगनमताने भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद पाडल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. आज सुरु असलेल्या भंडारा गोंदिया येथील लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये मतदार यंत्रातील बिघाडामुळे ३५ मतदान केंद्रांवरील प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.याशिवाय सकाळी काही ठिकाणच्या यंत्रणेत बिघाड झाला होता.
याबाबत आंबेडकर यांनी बोलताना सकाळी झालेल्या बिघाडामुळे मतदानाचा महत्वाचा वेळ वाया गेल्याचे म्हटले. या भागात तापमान ४७ ते ४७ अंश सेल्सियस असल्याने अनेकदा सकाळी अधिक मतदान होण्याची शक्यता होती. मात्र सुमारे १२ टक्के मतदान मशीनमध्ये बिघाड झाल्याने न होणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर २२ तारखेला निवडणूक यंत्रणा सर्व मशीन वापरण्यायोग्य आणि सुस्थितीत असल्याचा दावा करत होती. मग 28 तारखेला इतके मशीन बंद कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यामध्ये सरकार, निवडणूक आयोग आणि मशीन दुरुस्ती यंत्रणा यांनी संगनमताने हा प्रकार केल्याचा उल्लेख त्यांनी केला. जास्त मशीन बंद असलेला भाग आदिवासी वस्तीचा असून आदिवासी उमेदवार निवडून येवू नये म्हणून मशीन बंद पाडल्याची शक्यता त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. हे सर्व बघता या भागात पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.
या निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ट्रेल) मशीनचा वापर करण्यात येत आहे.मतदान प्रक्रिया संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहणार असून नक्षलग्रस्त मोरगाव अर्जुनीतालुक्यात तीन वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. दोन हजार 126 मतदान केंद्रांवर 17 लाख 48 हजार 677 मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.