गुंड प्रकाश चव्हाण खून प्रकरण; ६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

By नम्रता फडणीस | Published: November 19, 2024 06:27 PM2024-11-19T18:27:41+5:302024-11-19T18:28:38+5:30

तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि बॉलिस्टिक एक्स्पर्टचा रिपोर्ट महत्त्वाचा ठरला असून तब्बल दहा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला

Prakash Chavan murder case Life imprisonment for 6 accused | गुंड प्रकाश चव्हाण खून प्रकरण; ६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

गुंड प्रकाश चव्हाण खून प्रकरण; ६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

पुणे: कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण याची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी सहा आरोपींना न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि बॉलिस्टिक एक्स्पर्टचा रिपोर्ट महत्त्वाचा ठरला. आरोपींकडून तीन पिस्तुले आणि तीन कोयते जप्त करण्यात आले होते. तब्बल दहा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस वाघमारे यांनी हा निकाल दिला.

दिलीप विठ्ठल कांबळे, अनिल लक्ष्मण सपकाळ, अमर दिनकर शेवाळे, अमोल नारायण शिंदे, प्रकाशसिंग चंदनसिंग बायस आणि श्याम चंद्रकांत जगताप अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. प्रकाश चव्हाण हे महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट व सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष होते. प्रकाश चव्हाण याची स्वतःची एक गुन्हेगारी टोळी होती. टोळीचा म्होरक्या प्रकाश चव्हाण याची परिसरात दहशत होती. या टोळीची दहशत मोडून काढण्यासाठी आरोपींनी आपसात संगनमत करून प्रकाश चव्हाण याचा गेम करण्याचा प्लॅन केला. त्यानुसार, प्रकाश चव्हाण यांच्या हालचालीवर आरोपी पाळत ठेवून होते. दरम्यान, १० डिसेंबर २०१४ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास प्रकाश चव्हाण पूर्णानगर येथील एका सलूनमध्ये गेला. त्यावेळी हल्लेखोर सलून बाहेर दबा धरून बसले होते. प्रकाश चव्हाण सलूनच्या बाहेर येताच आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला. तसेच, धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रकाश चव्हाण याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात प्रकाश चव्हाण याचे अंगरक्षकदेखील जखमी झाले. तसेच, एका आरोपीचा घटनेदरम्यान झालेल्या मृत्यूची अपघाती मृत्यू झाल्याची नोंद आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी एकूण २२ साक्षीदार तपासले. यात फिर्यादी जखमी झाले. डॉक्टरांनी त्यांच्या दंडातून गोळी बाहेर काढली. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय नाईकपाटील, पोलिस निरीक्षक आर.बी उंडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) बिलाल शेख तसेच कोर्ट पैरवी पोलिस उपनिरीक्षक गोविंद मरभळ, हवालदार अनिल जगताप यांनी काम पाहिले.

Web Title: Prakash Chavan murder case Life imprisonment for 6 accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.