प्रकाश जावडेकर म्हणतात, अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मी तसं बोललोच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 03:52 PM2020-02-14T15:52:33+5:302020-02-14T15:57:55+5:30
पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश जावडेकर यांनी पक्षाच्या दिल्लीतील पराभवाबाबत भाष्य केले.
पुणे - दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावूनही भारतीय जनता पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, या पराभवानंतर भाजपा नेत्यांकडून पराभवाबाबत विविध कारणे समोर केली जात आहेत. त्यातच अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेली बेछूट टीका, गोली मारो, भारत पाकिस्तानसारखी वक्तव्ये भाजपाला भोवल्याचे सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांना आपण अतिरेकी म्हटलेच नव्हते, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश जावडेकर यांनी पक्षाच्या दिल्लीतील पराभवाबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, ''अरविंद केजरीवाल हे अतिरेकी आहेत आणि त्याचे अनेक पुरावे आहेत, असे मी बोललोच नव्हतो. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यावर काँग्रेस पक्ष दिल्लीतून लुप्त झालेला दिसत आहे. आता काँग्रेसची ही मते आपकडे वळली का हे माहीत नाही. मात्र त्यामुळे आप आणि भाजपामध्ये थेट लढत झाली. तसेच गोली मारो आणि भारत पाक ही विधाने भोवली, हे शहांचं निरीक्षण बरोबर आहे. पण या पराभवा मागे इतरही कारणे आहेत. खरंतर भाजपा हा शिकणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही या पराभवातून योग्य तो बोध घेऊ.''असेही जावडेकर यांनी सांगितले.
संबंधित महत्त्वाच्या बातम्या
Delhi Election Results : भाजपा नेत्यांची वादग्रस्त विधाने भोवली, अमित शाह यांनी चूक कबूल केली
गंभीर नसता तर भाजपाची अवस्था झाली असती आणखी गंभीर; जाणून घ्या कशी?
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या पराभवाची कारणमीमांसा केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाचे नुकसान झाल्याचे अमित शाह यांनी म्हटले होते. 'भाजपाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांची जेवढी चर्चा केली गेली, त्या तुलनेत राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्यांची चर्चा झाली नाही, असा दावाही अमित शाह यांनी केला. दरम्यान, काही निवडणुकांमध्ये पराभव झाला म्हणजे जनतेचा पक्षावरील विश्वास उडाला असे होत नाही. महाराष्ट्रात आम्ही जिंकलो होतो. हरयाणात आम्ही केवळ ६ जागा गमावल्या. नक्कीच झारखंडमध्ये आमचा पराभव झाला. तर दिल्लीच आम्ही आधीच पराभूत झालो होतो. मात्र दिल्लीत आमच्या जागा आणि मतांची टक्केवारी वाढली,'असेही अमित शाह यांनी यावेळी सांगितले.