प्रमोद मुबारक भाई पठाण एकमेव मुस्लिम चोपदार; विठुराया चरणी तन-मन-धन अर्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 03:43 PM2023-06-16T15:43:35+5:302023-06-16T15:44:24+5:30
मुबारक भाई दाऊद भाई पठाण यांच्यानंतर मुलगा प्रमोद मुबारक भाई पठाण यांनी पंढरीच्या वारीची परंपरा जोपासली
केडगाव : कुरुळी (ता. शिरूर) येथील पठाण कुटुंबाने पांडुरंगासाठी तन-मन-धन अर्पण केले आहे. संगम (ता. दौंड) येथील संतराज महाराज संस्थानवर या कुटुंबाची अपार श्रद्धा असून, १९७६ पासून आजतागायत या कुटुंबाने पंढरीच्या पायी वारीची परंपरा जोपासली आहे. संतराज महाराज संस्थानसाठी आवश्यक त्यावेळी चारचाकी गाडी प्रवासासाठी या कुटुंबाच्या वतीने दिली जाते. विशेष म्हणजे सर्व हिंदू व मुस्लिम सण, उत्सव, कुरुळी गावची यात्रा या कुटुंबामध्ये साजरी केली जाते. गावामध्ये व परिसरामध्ये जातीय भाईचारा जोपासण्याचे काम कुरुळी येथील पठाण कुटुंबीय करीत आहे.
या कुटुंबातील स्वर्गीय मुबारक भाई दाऊद भाई पठाण यांनी सलग १५ वर्षे आषाढी वारीसाठी चोपदार म्हणून काम केले. वारीमध्ये पायी चालत हातामध्ये राजदंड घेत वारकऱ्यांना शिस्त लावण्यामध्ये त्यांचा शिरस्ता होता. १९९३ ला संगम येथील महादेव मंदिर व पांडुरंगाच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी स्वर्गीय मुबारक भाई पठाण यांनी एक लाख रुपये देणगी रोख स्वरूपात दिली. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा प्रमोद मुबारक भाई पठाण यांनी पंढरीच्या वारीची परंपरा जोपासली आहे. त्यांच्यासोबत पत्नी शबानादेखील सहभागी झाल्या आहेत.
विशेष म्हणजे आपल्या मुलाने मुस्लिम धर्माप्रमाणेच हिंदूंचे सर्व सण, उत्सव जोपासावेत म्हणून त्यांनी मुलाचे नाव प्रमोद ठेवल्याचे जाणकार सांगतात. प्रमोद पठाण हे संतराज महाराज संस्थानचे संचालक असून, संस्थानच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. प्रमोद यांच्या कुटुंबाचा आषाढी वारीसाठी वेळापूर येथे असणाऱ्या अन्नदानासाठी कुरुळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पंक्तीमध्ये सक्रिय सहभाग असतो. तसेच संगम येथील अखंड हरिनाम सप्ताहाची पंगत व महाशिवरात्रीचा फराळ यामध्ये योगदान असते. आळंदी येथील शांतिनाथ महाराजांच्या मठामध्ये प्रतिवर्षी पठाण कुटुंबीयांच्या वतीने अन्नदान असते. यासंदर्भात प्रमोद पठाण म्हणाले की, वडील स्वर्गीय मुबारक भाई पठाण यांनी मुस्लिम सण, उत्सव साजरे करत हिंदू परंपराही जोपासल्या होत्या. पंढरीचा पांडुरंग हे त्यांचे अढळ श्रद्धास्थान होते. त्यांची परंपरा पुढे जोपासण्याचा मी प्रयत्न करत आहे. जोपर्यंत शरीर साथ देत आहे, तोपर्यंत पंढरीच्या पांडुरंगाची वारी करत राहणार आहे. संतराज महाराज देवस्थानच्या योगदानाबद्दल संस्थानचे अध्यक्ष सुरेश महाराज साठे व उपाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पठाण कुटुंबीयांचा सत्कार केला आहे.
मुबारक भाई पठाण ठरले महाराष्ट्रातील पहिले मुस्लिम चोपदार
पालखी सोहळ्यामध्ये चोपदार या व्यक्तीला विशेष महत्त्व असते. चोपदाराने केलेल्या राजदंडाच्या इशाऱ्यावर संपूर्ण पालखी सोहळा हा मार्गस्थ व नियंत्रित होत असतो. वारकऱ्यांना शिस्त लावण्याचे कामही चोपदारच करतो. या पार्श्वभूमीवर संतराज महाराज संस्थानने १९८० ला पठाण कुटुंबीयातील स्वर्गीय मुबारक भाई पठाण यांना चोपदार म्हणून जबाबदारी दिली. सलग २१ वर्षे ही जबाबदारी मुबारक भाईंनी प्रामाणिकपणे सांभाळत अनोखा आदर्श घालून दिला.