डॉक्टरांमुळे सुनीलच्या जगण्यात आले प्राण
By admin | Published: April 9, 2017 04:32 AM2017-04-09T04:32:03+5:302017-04-09T04:32:03+5:30
रक्त पोहोचविणारी शिर मणक्यामध्ये अडकल्यामुळे अहमदनगरमधील सुनील राम जाधव याचे हात व पाय लुळे पडले होते. लातूरपासून अनेक ठिकाणी मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये
भोसरी : रक्त पोहोचविणारी शिर मणक्यामध्ये अडकल्यामुळे अहमदनगरमधील सुनील राम जाधव याचे हात व पाय लुळे पडले होते. लातूरपासून अनेक ठिकाणी मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्याला दाखविण्यात आले़ मात्र, याचे आॅपरेशन होऊ शकत नाही, आॅपरेशन केले तरी फारसा उपयोग होणार नाही, असे सुनीलच्या पालकांना सांगण्यात आले. येथील वायसीएम हॉस्पिटलचे न्युरो सर्जन डॉ. अमित वाघ यांनी हे आव्हान स्वीकारले आणि सुनीलच्या चेतनाशून्य अवयवांमध्ये जणू प्राण फुंकले. अत्यंत क्लिष्ट अशी ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, पंधरा दिवसांत सुनील चालू शकेल, असा विश्वास डॉ. वाघ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.
लातूर जिल्ह्यातील गोताळा या छोट्याशा गावात मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या राम व लक्ष्मी जाधव या दाम्पत्याचा सुनील हा १० वर्षांचा मुलगा. त्याच्या या आजाराविषयी ते सांगत होते, लहानपणापासूनच त्याची मान जखडली होती. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य नव्हते. त्याचे वय वाढले तसे या आजाराने हातपाय पसरायला सुरुवात केली. मान व त्यानंतर हळूहळू हात व पायाची हालचाल मंदावली. उचलून घेऊनच त्याला शाळेत घेऊन जायला लागायचे. आधाराशिवाय तो काहीच करू शकत नव्हता. त्याच्या आयुष्याचा प्रश्न होता. आमचा मुलाने इतर मुलांप्रमाणे खेळावे, बागडावे असे वाटत होते; पण या आजाराने त्याला जायबंदी करून ठेवले होते. त्याला लातूर येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखविले; पण डॉक्टरांनी उपचार होऊ शकणार नाही, असे त्याची आई लक्ष्मी जाधव यांना सांगितले. काय करावे काहीच सुचत नव्हते. हा आजार दुर्मिळ असल्यामुळे आॅपरेशन करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येईल, असे लोक सांगत तेव्हा मन दु:खी व्हायचे. वायसीएम हॉस्पिटलविषयी बोलताना राम जाधव यांनी सांगितले की, ‘आमचा मोठा मुलगा भोसरीत एका कंपनीत कामाला आहे. त्याने आम्हाला सुनीलला घेऊन पुण्यास येण्यास सांगितले. एक महिन्यापूर्वी आम्ही हॉस्पिटलमध्ये न्युरो सर्जन डॉ. अमित वाघ यांना सुनीलला दाखविले. त्यांनी सर्व तपासण्या करून आॅपरेशन करावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार सुनीलचे आॅपरेशन करण्यात आले.
डॉ. वाघ म्हणाले, शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलचे डॉ. के. अनिल रॉय यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलेच. तसेच डॉ. मनोज देशमुख, भूलतज्ज्ञ डॉ. मुग्धा मार्कण्डेय, डॉ. राजेश गोरे, यांचे सहकार्य मिळाले. (वार्ताहर)
हा आजार दुर्मिळ असून, लाखात एकाला होतो. यामुळे मेंदूतून येणारी शिर दबल्यामुळे शरीराच्या हालचाली बंद पडू शकतात. सुनीलच्या या आजारात मेंदूतून येणारी नस एक व दोन नंबरच्या मणक्यामध्ये दबली होती. त्यामुळे त्याची मान, हात व पाय जखडले होते. ही शस्त्रक्रिया अत्यंत क्लिष्ट व जोखमीची असल्यामुळे सहसा डॉक्टर अशी शस्त्रक्रिया करण्यास धजावत नाहीत. शक्यतो असा आजार हा जन्मत: किंवा कष्टकरी, कामगार यांच्यामध्ये वाढू शकतो. हा आजार दुर्मिळ असला तरी योग्य निदान व उपचारामुळे तो पूर्ण बरा होऊ शकतो. माझ्यासाठी हे एक आव्हान होते.
- डॉ. अमित वाघ, न्युरो सर्जन
लहानपणापासून आमच्या मुलाची मान वाकडी झाली होती. दवापाण्यासाठी जवळ पैसा नव्हता. हळूहळू त्याचा हा आजार वाढत गेला़ त्याचे हात-पाय जायबंदी झाले. खूप दवाखाने केले; पण काही उपयोग झाला नाही. शेवटी वायसीएम हॉस्पिटलचा पत्ता मिळाला. इथल्या डाक्टरांनी आमच्या पोराला जीवदान दिले. आमचा मुलगा आता खेळेल, बागडेल, शाळेत जाईल याचा मोठा आनंद आम्हाला होईल. डाक्टर अमित वाघ यांच्या रूपाने आमच्या पोरासाठी देवच धावून आला आहे. त्यांचे उपकार आम्ही कधीच फेडू शकणार नाही.
- राम जाधव, वडील