मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठे यांना अटक; 18 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:16 AM2021-08-13T04:16:20+5:302021-08-13T04:16:20+5:30
पुणे : ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोने, चांदी आदी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवित, ...
पुणे : ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोने, चांदी आदी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवित, गुंतवणूक करण्यास भाग पाडून 18 गुंतवणूकदारांची 5 कोटी 9 लाख 72 हजार 970 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मराठे ज्वेलर्सचा माजी भागीदार प्रणव मराठे याला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. तपासासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या वेळोवेळी नोटीसा पाठवूनही हजर न राहिल्याबद्दल पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विशेष न्यायाधीश एस.एस गोसवी यांनी त्याला 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शुभांगी विष्णू काटे( वय 59, शिवतीर्थनगर,
कोथरूड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कौस्तुभ अरविंद मराठे, मंजिरी कौस्तुभ मराठे, नीना मिलिंद मराठे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेले मराठे ज्वेलर्सचे मिलिंद उर्फ बळवंत मराठे यांच्यावर देखील गुन्हा दाखल आहे. प्रणव मराठे ज्वेलर्सच्या लक्ष्मी रस्ता आणि पौड रस्ता येथील शाखांमध्ये 14 जानेवारी 2017 ते जानेवारी 2021 दरम्यान हा प्रकार घडला.
प्रणव मराठे यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी मराठे हा मराठा ज्वेलर्सच्या भागीदारी संस्थेत 1 जुलै 2014 ते 30 नोव्हेम्बर 2018 दरम्यान भागीदार होता. आयुष्यभराची सर्व कमाई ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवली आहे. मात्र आरोपीने गुंतवणूकदारांची रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरली आणि व्यापाऱ्यात त्याचा सक्रिय सहभाग असल्याचे दिसून येते.आरोपीने वैयक्तिक तसेच संयुक्तिक बँक खात्याचा तपशील सादर केलेला नाही तो प्राप्त करायचा आहे. तसेच ठे वीदारांच्या ठेवी व्याजासह परत न करता त्याचा विनियोग कोणत्या मालमत्ता खरेदी विक्री करण्यासाठी करण्यात आला आहे. याबाबत कागदपत्रे हस्तगत करायची आहेत असा युक्तिवाद करीत, आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकिल एम.बी वाडेकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
...