‘दगडूशेठ’च्या श्रींची मुख्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:10 AM2021-09-11T04:10:44+5:302021-09-11T04:10:44+5:30
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षी गणेश चतुर्थीला सकाळी श्रींची प्राणप्रतिष्ठा ...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षी गणेश चतुर्थीला सकाळी श्रींची प्राणप्रतिष्ठा झाली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर आणि वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा पार पडला.
भाविकांनी बाहेरुनच दर्शन घेत कोरोनाचे संकट लवकर दूर होवो, अशी श्रींच्या चरणी प्रार्थना केली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळदेखील स्वीकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सवकाळात गर्दी करू नये व ऑनलाइन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे केले आहे.
----------
ऑगमेंटेंड रिॲलिटी तंत्रज्ञानाचा वापर
ऑगमेंटेंड रिॲलिटी या तंत्रज्ञानाचा वापर हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. http://www.DagdushethGanpati.net या लिंकवर जाऊन घरी भक्तांनी आरती करतानाचा व्हिडिओ काढल्यास प्रत्यक्ष दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात श्रींची आरती करतानाचा व्हिडिओ तयार होणार आहे. आपण गाभाऱ्यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करीत असल्याचा आनंद व्हिडिओ पाहून भक्तांना घेता येईल.
--------------
ॠषीपंचमीनिमित्त ऑनलाइन अथर्वशीर्ष पठण
ऋषीपंचमीनिमित्त ११ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता अथर्वशीर्ष पठण सोहळा ऑनलाइन पद्धतीने होईल. ट्रस्टच्या फेसबुक पेज, इंस्टाग्राम याद्वारे या उपक्रमाचा आनंद भाविकांना घेता येणार आहे. श्रींचे ऑनलाइन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, ॲप, फेसबुक, यू ट्यूब, ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय केली आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.