प्रशांत दामले हे नाट्यक्षेत्रातील शास्त्रज्ञ : डॉ. रघुनाथ माशेलकर; परिवर्तन सन्मान पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:03 PM2017-12-13T12:03:51+5:302017-12-13T12:08:31+5:30
अभिनेते प्रशांत दामले हे विनोदी कौटुंबिक नाटकाचे खऱ्या अर्थाने संशोधक व शास्त्रज्ञ कलाकार आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी काढले़
पुणे : ज्या काळात मराठी रंगभूमीकडे प्रेक्षकांची संख्या कमी होण्याची चिंता निर्माण झाली होती. त्या नाटकांच्या संक्रमण काळात प्रेक्षकांना व तरुणाईला पुन्हा नाटकाकडे आकर्षित करण्याचे महत्वाचे काम प्रशांत दामले यांनी केले. त्यामुळे अभिनेते प्रशांत दामले हे विनोदी कौटुंबिक नाटकाचे खऱ्या अर्थाने संशोधक व शास्त्रज्ञ कलाकार आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी काढले़
परिवर्तन संस्थेच्या वतीने परिवर्तन सन्मान पुरस्कार देऊन प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी ते बोलत होते़ याप्रसंगी अभिनेत्री शुभांगी गोखले, नम्रता देशपांडे, संकर्षण कऱ्हाडे, चंद्रकांत कुलकर्णी, परिवर्तनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शैलेश गुजर, भाऊसाहेब कासट, शैलेश शहा, संदीप चाफेकर, नाट्य व्यवस्थापक समीर हंपी आदि उपस्थित होते़.
प्रशांत दामले म्हणाले, नटेश्वराने मला मराठी रंगभूमीची सेवा करण्याची संधी दिली आणि सुजाण, संयमित प्रेक्षक, उत्तम संहिता, उत्तम दिग्दर्शक आणि अभिनय संपन्न सहकलाकार, पडद्यामागील सहकारी कलाकार आणि पत्नी व मुली यांच्या सहकार्यामुळेच मी येथपर्यंतचा प्रवास करू शकलो़ मराठी नाटकांचा सर्वोच्च विक्रम प्रस्थापित करण्याचे भाग्य या जन्मी मला मिळाले याचा मला सार्थ अभिमान आहे़ कारण मराठी भाषा, मराठी प्रेक्षक आणि मराठी नाट्य याला सर्वोच्च स्थान मिळाले पाहिजे, या ध्येयाने मी माझी पुढील वाटचाल सुरु ठेवली आहे़
प्रारंभी डॉ़ शैलेश गुजर म्हणाले, प्रशांत दामले यांनी १३ हजारहून अधिक प्रयोग करुन रंगभूमीवरुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले़ नाटकासह सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून ते गेली ३५ वर्षे परिवर्तनाचे काम करीत आहेत़ त्यामुळे त्यांना परिवर्तन सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.