प्रशांत जगताप राष्ट्रवादीचे नवे शहराध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:12 AM2021-05-08T04:12:06+5:302021-05-08T04:12:06+5:30
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून माजी महापौर प्रशांत जगताप यांची निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी त्यांंना ...
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून माजी महापौर प्रशांत जगताप यांची निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी त्यांंना नियुक्तीचे पत्र दिले.
आमदार चेतन तुपे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. वैयक्तिक कारणामुळे तुपे यांनी पद सोडले होते. पवार यांनी ही जबाबदारी जगताप यांच्यावर सोपवली आहे.
जगताप मागील २१ वर्षांपासून नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी पीएमटीचे संचालक म्हणूनही काम पाहिले होते. जगताप घराणे प्रथमपासूनच पवार घराण्याशी एकनिष्ठ आहे. जगताप यांच्या मातोश्री रत्नमाला याही नगरसेवक आहेत.
पक्षाचा तरुण व अभ्यासू चेहरा अशी प्रशांत यांची ओळख आहे. महापौर असताना त्यांंनी आक्रमकपणे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबरोबर शहराच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वादंग केले होते. त्यामुळेच अनेक इच्छुकांंना डावलून स्वतः अजित पवार यांनी जगताप यांची निवड केली आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून, सलग १० वर्षे महापालिकेत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीला पुन्हा सत्तास्थानी आणण्याला प्राधान्य देणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.