भाजपला रामराम करत प्रशांत पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:31+5:302021-07-17T04:10:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सख्खे चुलत बंधू व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सख्खे चुलत बंधू व इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांतराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेंस पक्षात प्रवेश केला. यामुळे हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू व भाजपचे नेते प्रशांत पाटील यांची मागील काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षात घुसमट होत होती. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संपर्कात माजी सभापती प्रशांतराव पाटील मागील कालावधीत अनेक वेळा आले. १९९६ मध्ये प्रशांतराव पाटील यांनी बावड्याचे पाटील घराणे एकत्र करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली होती. अत्यंत अभ्यासू आक्रमक म्हणून प्रशांतराव पाटील इंदापूर तालुक्याला नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत.
प्रशांतराव पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राहत्या बावडा गावात व बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात, तसेच इंदापूर तालुक्यात राजकीय प्रचंड मोठा परिणाम होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पहिल्यांदाच बावडा येथील प्रसिद्ध असणाऱ्या पाटील घराण्यात जनाधार प्राप्त झाला आहे. इंदापूर तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना तसेच इतर संस्थांमध्येेेे व पंचायत समितीमध्ये प्रशांतराव पाटील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनेेे काम केले आहे. याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इंदापूर तालुक्यात होणार आहे. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये भाजप नेते प्रशांतराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश शुक्रवारी (दि. १६) झाला. या वेळी सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, तालुका उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव इजगुडे, सचिन सपकाळ, युवा उद्योजक रणजित घोगरे व इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत पाटील यांच्यासह त्यांचे चिरंजीव संग्राम प्रशांत पाटील, कुलदीप प्रशांत पाटील आणि इंदापूर तालुक्यातील भोडणी ग्रामपंचायत सदस्य अॅड. संचित हंगे यांनीही प्रवेश केला.
चौकट : ए तो ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं...!
इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांतराव पाटील प्रवेश केल्यानंतर म्हणाले की, इंदापूर तालुक्याची जडण-घडण काँग्रेस विचारातून झाल्यामुळे आमची भाजपमध्ये घुसमट होत होती. इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस बलवान बनवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार अशी ग्वाही देत प्रशांतराव पाटील म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहेत. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत. यांच्याच माध्यमातून इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, असा मला विश्वास आहे. माझा प्रवेश म्हणजे, ए तो ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं...! अशी प्रतिक्रिया सभापती प्रशांतराव पाटील यांनी दिली.
चौकट :
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन आणखी दमदार होईल.
इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांतराव पाटील यांना सामाजिक राजकीय कामाचा अत्यंत सखोल अनुभव असल्यामुळे व बावडा परिसरात अनेक कुटुंबांची ऋणानुबंध पाटील यांचे असल्यामुळे इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन दमदार होण्यासाठी मदत होईल, अशी माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
फोटो ओळ : इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांतराव पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर या वेळी उपस्थित होते.