गळफास घेत असलेल्या तरुणांचे बीट मार्शलनी वाचविले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 10:37 PM2019-05-15T22:37:23+5:302019-05-15T22:37:29+5:30
मी घरात लटकून घेतो आहे, तू घरी येईपर्यंत माझे मढे तुला मिळेल, असा त्याने पत्नीला फोन केला. घाबरलेल्या पत्नीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून ही माहिती दिली.
पुणे/ सहकारनगर : मी घरात लटकून घेतो आहे, तू घरी येईपर्यंत माझे मढे तुला मिळेल, असा त्याने पत्नीला फोन केला. घाबरलेल्या पत्नीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून ही माहिती दिली. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी १ मिनिटातच त्याच्या घरी पोहोचले. त्यांनी खिडकीतून पाहिले तर त्याने गळफास घेतला होता. पण त्याच्या पायाची हालचाल दिसून आली. तेव्हा धिप्पाड बीट मार्शलने आपल्या ताकदीच्या जोरावर भक्कम असा लोखंडी दरवाजा तोडला. दरवाज्याचा पत्रा थोडा तुटताच त्यांनी हात घालून कडी काढली व धावत जाऊन त्या तरुणाला खाली घेतले. त्यांनी पाहिले तर तो बेशुद्ध होता, पण जिवंत होता. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून प्राण वाचविले. गळफास घेतल्याची माहिती मिळाल्यावर काही मिनिटातच बीट मार्शलांनी केलेल्या या प्रयत्नामुळे एका तरुणाचे प्राण वाचू शकले. ही घटना पर्वती दर्शनमधील चाळ क्रमांक ५१ मध्ये मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घडली आणि ते बीट मार्शल होते़ पोलीस काँस्टेबल विष्णू सुतार आणि अनिल लांडे या दोघांनी काही मिनिटात घटनास्थळी पोहचून दाखविलेले प्रसंगावधान आणि केलेल्या कृतीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल विष्णू सुतार, अनिल लांडे हे पर्वती दर्शन भागात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बिट मार्शल ड्युटी करत होते. त्या वेळी त्यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून एक मेसेज मिळाला की, पर्वती दर्शन चाळ नंबर ५१ मध्ये एक गळफास लावून घेत आहे. आपण ताततडीने तेथे जाऊन त्याला वाचवा. ही माहिती मिळताच दोघेही दिलेल्या पत्त्यावर गेले आणि त्यांनी पाहिले. तेव्हा एका घराचा लोखंडी दरवाजा आतून बंद केलेला होता. त्या घराच्या खिडकीतून पाहिले़ तेव्हा एक युवकाने घराच्या छताला लाल ओढणीने स्वत:ला गळफास घेतला होता़ त्याचे पाय हालताना दिसत होते. त्याला वाचविण्यासाठी विष्णू सुतार, अनिल लांडे या पोलिसांनी लोखंडी दरवाजा तोडला. व त्याला उचलून बाहेर आणले. तो बेशुद्ध असल्याने त्याला सर्वात प्रथम रिक्षातून हरजीवन हॉस्पिटलला नेले़ परंतु त्यांनी आमच्याकडे सुविधा नसल्याने सांगून दुस-या हॉस्पिटलला नेण्यास सांगितले़ त्यांनी वेळ न दवडता त्याला पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस हवालदार अशोक हिरवाळे, नितीन केरीपाळे यांच्या मदतीने काही वेळात सर्व आवश्यक कार्यवाही करून निलेश सुरेश साळवे याचा जीव वाचविला. त्याची पत्नी रोजमेरी निलेश साळवे (रा. चाळ नंबर ५१/१ पर्वती दर्शन) या म्हणाल्या, त्यांचे पती निलेश सुरेश साळवे हे अति दारूच्या नशेत घरात असताना मानसिक संतुलन ढळले की,त्यांच्या मनात असे स्वत:चे जीवन संपविण्याचा विचार येत असल्याने ते खरंच काही विपरीत करून घेतील, चिंतेमधून त्यांनी सर्वात प्रथम पोलिस नियंत्रण कक्ष येथे मदतीसाठी ही माहिती कळवली होती.
याबाबत विष्णु सुतार यांनी सांगितले की, कंट्रोलचा फोन आला तेव्हा आम्ही दर्शन चौकीतच होतो. तेथून एकच मिनिटात साळवे याच्या घरी पोहचलो. घराच्या खिडकीची जाळी तोडली तर आत एका तरुणाने गळफास घेतला होता़ त्याचे पाय हलताना दिसले. त्यामुळे तो अजून जीवंत असल्याचे दिसल्याने मी लोखंडी दरवाज्याची एक बाजू तोडली व आत हात घालून कडी काढली़ त्याला खाली उतरविले तेव्हा तो बेशुद्ध होता. त्याचा वाचवायचे हाच विचार त्यावेळी आमच्या मनात होता. विष्णु सुतार आणि अनिल लांडे यांच्या या कामगिरीची माहिती मिळाल्यावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे़ ज्या उद्देशाने बीट मार्शलची नेमणूक केली जात आहे, तो उद्देश विष्णु सुतार आणि अनिल लांडे यांच्यासारख्यांच्या कामगिरीमुळे सफल होत असल्याचे दिसून येत आहे.