राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी प्रताप पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 04:45 PM2018-04-10T16:45:19+5:302018-04-10T16:45:19+5:30
गेल्या महिन्यात मतदानादिवशी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकाजवळील राज्य सहकारी संघाच्या कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या मतदानात झालेल्या गोंधळानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आणि भाजप पुरस्कृत उमेदवारांनी मंगळवारी (दि. १०) सामंजस्याची भूमिका घेतली. राष्ट्रवादी कॉंगेसचे प्रताप पाटील (सांगली) यांची अध्यक्षपदी, तर आरपीआयच्या सिद्धार्थ पथाडे (चंद्रपूर) यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. कॉंग्रेसच्या विद्या पाटील या मानदसचिव पदी ३ मतांनी निवडून आल्या.
गेल्या महिन्यात मतदानादिवशी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकाजवळील राज्य सहकारी संघाच्या कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणुकीत विजयी झालेल्या २१ संचालकांनाच मतदान कक्षात सोडण्यात आले. तसेच, मतदान केंद्रात देखील टेबल-खुर्च्यांऐवजी गाद्या ठेवण्यात आल्या होत्या. गोंधळानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपापल्या समर्थकांना सामंजस्याने निवडणूक घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या प्रताप पाटील यांची निवड करण्यात आली. गेल्या चाळीस वर्षांत प्रथमच सांगली-कोल्हापुर भागाला अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. पाटील यांनी या पुर्वी सहकारी संघाच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये विद्या परिषद, तसेच अधिसभेवरही त्यांची निवड झाली आहे. मानद सचिव पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या विद्या पाटील (लातूर) यांनी हिरामण सातकर (पुणे) यांचा १२ विरुद्ध ९ अशा फरकाने पराभव केला. जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. पोलीस
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणूकीत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलचा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत संजीव कुसाळकर पॅनेलने पराभव केला होता. गेल्या महिन्यात १९ मार्चला निवडून आलेल्या २१ संचालकांमधून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार होती. मतदानादिवशी आमदार दरेकर यांच्या समर्थकांनी आपल्याकडे १३ सदस्य असल्याचा दावा केला होता. तर कुसाळकर समर्थकांनी आपलेच बहुमत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी झालेल्या वादात मतदान कक्षातील टेबल-खुर्च्या उधळून लावण्यात आल्या होत्या. कॉंग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे अमोल घुले यांनी पिस्तुल दाखविल्याचा आरोप दरेकर समर्थकांनी केला होता. या प्रकरणी घुले यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा देखील दाखल आहे.