वालचंदनगर-कळस गटात प्रतापराव पाटील विजयी
By admin | Published: January 31, 2015 12:28 AM2015-01-31T00:28:01+5:302015-01-31T00:28:01+5:30
वालचंदनगर-कळस जिल्हा परिषद गटाच्या पोट निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रदीप पाटील
इंदापूर : वालचंदनगर-कळस जिल्हा परिषद गटाच्या पोट निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रदीप पाटील यांचा धुव्वा उडवत त्यांच्यावर ७ हजार २७० मतांच्या फरकाने विजय मिळविला.
भाजपाचे उमेदवार युवराज म्हस्के यांच्यासह सहा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. निवडणुकीत उभ्या असणाऱ्या सर्व उमेदवारांची आकडेवारी पाहता त्या सर्वांपेक्षा तब्बल ४ हजार ४३९ मते जादा घेत प्रतापराव पाटील यांनी हा विजय संपादित केला आहे. प्रतापराव पाटील यांना १२ हजार ७२२ मते मिळाली. प्रदीप पाटील यांनी ५ हजार ४५२ मते मिळाली. तर युवराज म्हस्के यांना १ हजार ६७८ मते मिळाली. प्रतापराव पाटील यांच्या विरोधकांच्या एकूण मतांची आकडेवारी ८ हजार २८३ आहे.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर वालचंदनगर- कळस जिल्हा परिषदेची जागा रिक्त झाली होती. त्या जागेची ही पोटनिवडणूक खरे तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीत भाजपामध्ये ऐनवेळी प्रवेश केलेले युवराज म्हस्के यांना केवळ १६७८ मते मिळाली. शिवसेनेचे मंदार डोंबाळे यांना ३१५, राष्ट्रीय समाज पक्षाचे दिलीप धायगुडे यांना ५०३ मतांवर समाधान मानावे लागले. एकूणच या निवडणुकीवर आमदार दत्तात्रय भरणे यांचा प्रभाव दिसून आला. (वार्ताहर)