Forbes List: ‘फोर्ब्स’च्या शक्तिशाली महिलांच्या यादीत पुण्याच्या प्रतिमा जोशी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 01:33 PM2021-12-25T13:33:20+5:302021-12-25T13:35:52+5:30

राज्यातील ७ शहरांमध्ये त्यांचे काम असून, मागील काही वर्षात त्यांनी ‘शेल्टर’ संस्थेच्या माध्यमातून २५ हजार शौचालयांचे बांधकाम केले आहे

pratima joshi on Forbes list of powerful women pune latest news | Forbes List: ‘फोर्ब्स’च्या शक्तिशाली महिलांच्या यादीत पुण्याच्या प्रतिमा जोशी

Forbes List: ‘फोर्ब्स’च्या शक्तिशाली महिलांच्या यादीत पुण्याच्या प्रतिमा जोशी

Next

राजू इनामदार

पुणे : फोर्ब्स या आंतरराष्ट्रीय मासिकाने शक्तिशाली महिलांच्या यादीत पुण्याच्या प्रतिमा जोशी (pratima joshi in forbes powerful women list) यांचा समावेश केला आहे. डिसेंबर २०२१च्या अंकात त्यांच्यावर विशेष लेख प्रसिद्ध करण्यात आला असून, सामाजिक कामात अग्रेसर असल्याबद्दल त्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख आहे.

व्यवसायाने वास्तूरचनाकार असलेल्या जोशी सन १९८७पासून झोपडपट्टीतील रहिवाशांच्या आरोग्याचा स्तर उंचावण्याचे काम करत आहेत. राज्यातील ७ शहरांमध्ये त्यांचे काम असून, मागील काही वर्षात त्यांनी ‘शेल्टर’ संस्थेच्या माध्यमातून २५ हजार शौचालयांचे बांधकाम केले आहे.

या कामासाठी त्यांनी अभ्यासपूर्वक पद्धत विकसित केली आहे. शौचालयांच्या बांधकामांबरोबरच झोपडपट्टयांमधील घरांना त्यांची स्वत:ची खास ओळख ‘गुगल’च्या माध्यमातून मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. याचबरोबर झोपडपट्टीत कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यातही त्यांनी यश मिळवले.

पदवी घेतल्यापासूनच त्यांनी स्वत:ला सामाजिक कामात गुंतवून घेतले आहे. त्यातूनच झोपडपट्ट्यातील शौचालयांचा प्रश्न हाताळण्यास त्यांनी सुरूवात केली. कोणतेही काम अभ्यासपूर्वक करायचे, या त्यांच्या सवयीमुळे त्यांनी प्रथम झोपडपट्ट्यांचा नकाशा तयार करण्यास सुरूवात केली. घरांच्या जागेसह या नकाशात जलवाहिन्या, मैलावाहिन्या, पाण्याची उपलब्धता याचीही अचूक माहिती असते. त्यामुळे काम करणे सोपे होते, असे त्यांनी सांगितले.

शौचालय व त्यावर एक मोठी फरशी टाकली की, लगेच साधी मोरी, असेही त्यांनी कमी जागा असलेल्या घरांमध्ये केले आहे. पुणे, पिंपरी - चिंचवड, कोल्हापूर, नवी मुंबई, ठाणे व अन्य काही महापालिकांमध्ये मिळून त्यांनी आतापर्यंत २५ हजार शौचालयांचे बांधकाम केले आहे. यासाठी त्यांनी एकदाही सरकारी आर्थिक मदत घेतलेली नाही. ‘सीएसआर’ फंडातून त्यांनी हे काम केले.

त्यांनी काम केेलेल्या ठिकाणच्या महिला व युवतींच्या आरोग्याची तपासणी गोखले संशोधन संस्थेने केली. त्यात ‘युरीन’शी संबधित आजारांचे प्रमाण तब्बल ९३ टक्क्यांनी कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्याशिवाय अनेक महिलांनी आता आमचे खाणे व पाणी पिणे यात चांगली वाढ झाल्याचे सांगितले.

Web Title: pratima joshi on Forbes list of powerful women pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.