प्रातोप्रांतीचे क्रांतिकारक- तमिळनाडूचा स्वाभिमानी राजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:18+5:302021-05-28T04:08:18+5:30
जगवीर राजाच्या मृत्यूनंतर १७९० मध्ये बोम्मू याची राजेपदावर निवड झाली. बोम्मू धाडसी आणि शूर तर होताच, गादीवर येताच त्याने ...
जगवीर राजाच्या मृत्यूनंतर १७९० मध्ये बोम्मू याची राजेपदावर निवड झाली. बोम्मू धाडसी आणि शूर तर होताच, गादीवर येताच त्याने गुन्हेगारांवर वचक बसवला. त्यामुळे अल्पावधीतच तो आपल्या प्रजेच्या लाडका राजा झाला.
पंचलमकुरुच्चीच्या आजूबाजूंची बहुतेक राज्ये इंग्रजांच्या ताब्यात आली होती. त्यांनी बोम्मूराजाकडेही खंडणी मागितली. परंतु अत्यंत तडफदारपणे बोम्मूराजाने खंडणी नाकारली व युद्धाची तयारी सुरू केली, तरीही जॅक्सन नावाच्या अधिकाऱ्याने बोम्मूराजास भेटीस बोलावले. मुका भाऊ उमैदौरे याला कपटाची शंका आल्यामुळे त्याने बोम्मूराजाबरोबर साध्या वेषातील अनेक सैनिक पाठवले. प्रत्यक्ष भेटीत जॅक्सनने त्याला कैद करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी बोम्मूराजाला कैद करण्याऱ्या लेफ्टनंट क्लार्क याला बोम्मूराजाने ठार मारले. इंग्रजी सैन्याचा पराभव करून बोम्मूराजा व उमैदौरे निसटून आले. त्याचा सेनापती मात्र पकडला गेला.
जॅक्सनच्या जागी आलेल्या अधिकाऱ्यांनी खंडणी मागितली व आजूबाजूंचा आणखीन प्रदेश ताब्यात घेतला. जॉन बॅनरमन यांच्या आधिपत्याखाली इंग्रज सैन्याने ऑगस्ट १७९९ मध्ये पंचलमकुरुच्चीवर हल्ला केला. स्वतः बोम्मूराजा युद्धासाठी बाहेर पडला. किल्ल्याच्या दक्षिण दरवाज्याजवळ तुंबळ लढाई झाली . बोम्मूराजा या लढाईतून निसटला आणि पंचलमकुरुच्ची इंग्रजांनी जिंकली. बोम्मूराजा आणि त्याचे भाऊ व विश्वासू सरदारांनी जंगलात आश्रय घेतला होता. परंतु टोण्डैमान नावाच्या जमीनदाराने विश्वासघाताने बोम्मूराजाला पकडून दिले. इंग्रजांच्या नीतीप्रमाणे खटल्याचे नाटक झाले. बोम्मूराजाने माफी मागण्याचे नाकारले. १६ ऑक्टोबर १७९९ या दिवशी सर्व जनतेसमोर इंग्रजांनी बोम्मूराजा म्हणजेच वीरपांड्य कट्टबोम्मन यास फासावर चढवले. फासावर जाण्यापूर्वी भूमीवरची माती आपल्या डोक्याला लावून त्याने भूमीवर डोके टेकवले. बोम्मूराजाच्या मृत्यूनंतरही उमैदौरे आणि दोरेसिंह या भावांनी तुरुंगातून सुटका करून घेतली व पुन्हा लढा देण्यास सुरुवात केली. एका लढाईत मॅकेले या इंग्रज अधिकाऱ्याचा त्यांनी पराभवही केला.
बोम्मूराजाच्या मृत्यूमुळे जनता इंग्रजांविरुद्ध अधिकच चिडली होती. पंचलमकुरुच्चीचा किल्ला जिंकून उमैदौरे याने किल्ल्याची डागडुजी केली. परंतु अखेरच्या युद्धात ते दोघेही भाऊ मारले गेले .आपल्या राज्याच्या स्वतंत्रतेसाठी अखेरपर्यंत लढणाऱ्या वीरपांड्य कात्ताबोम्मन आणि त्याचे दोन भाऊ उमैदौरे व दोरेसिंह यांच्या बलिदानामुळे तमिळनाडूमध्ये इंग्रजांविरुद्ध जनक्षोभ वाढू लागला .