एक कोटींची खंडणी घेणारे प्रवीण चव्हाण २२ खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 11:00 AM2023-01-17T11:00:00+5:302023-01-17T21:40:02+5:30
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे पोलिस अधिकाऱ्यांना दबावतंत्र वापरतात व आपल्या पदाचा गैरवापर करतात, याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता
पुणे : बीएचआर प्रकरणात जामिनासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन तब्बल एक कोटी २२ लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे २२ खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील होते. दरम्यान, डेक्कन पोलिस ठाण्यात सोमवारी दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हा पुणेपोलिसांनी जळगाव पोलिसांकडे हस्तांतरित केला आहे.
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे पोलिस अधिकाऱ्यांना दबावतंत्र वापरतात व आपल्या पदाचा गैरवापर करतात, याचा गौप्यस्फोट तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. त्यानंतर प्रवीण चव्हाण यांनी बीएसआर प्रकरणात विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला होता. त्याशिवाय त्यांच्याकडे इतर अनेक महत्त्वाच्या विशेषत: आर्थिक गुन्ह्यांसंदर्भातील खटल्यात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यात प्रामुख्याने पुण्यात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, शिवाजीराव भोसले सहकारी बँक, माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे मोक्का केसेस, एज्युकेशन स्कॅम रमेश कदम, महेश मोतेवार फसवणूक अशा २२ गुन्ह्यांमध्ये ते विशेष सरकारी वकील होते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर कोथरुड पोलिस ठाण्यात जो गुन्हा दाखल झाला होता, त्यामध्येही विशेष सरकारी वकीलही तेच होते. भाजप सेनेचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर कायदा व न्याय विभागाने सप्टेंबर २०२२ मध्ये प्रवीण चव्हाण यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली.
बीएचआरमध्ये १९ आरोपींवर दोषारोप पत्र दाखल
पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बीएचआरमधील गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १९ आरोपींना अटक केली होती. त्यात आरोपींच्या अटकेनुसार वेगवेगळ्या वेळी ४ पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर या सर्व १९ आरोपींची सध्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तसेच त्यातील ४ आरोपींना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. सध्या या खटल्यात सरकारने नवीन विशेष सरकारी वकिलाची नेमणूक केली आहे.
पुणे पोलिसांनी केलेल्या तपासाची सीआयडीने केली चौकशी
भाईचंद हिराचंद मल्टी स्टेट को-ऑप. सोसायटी (बीएचआर) मध्ये पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासाबाबत सूरज झंवर यांनी राज्य गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यात अनेक गोष्टी पोलिसांनी अधिकाराच्या बाहेर जाऊन केल्याचे म्हटले होते. त्याचा तपास सीआयडीने केला होता. त्याचा अहवालही गृह विभागाला सादर केल्याचे समजते.
गुन्हा जळगावला हस्तांतरित
डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यांतील सर्व घटना या जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो अधिक तपासासाठी जळगाव पोलिसांकडे हस्तांतरित केला आहे.