प्रवीण दरेकरांची नगरसेवक होण्याची लायकी नाही; ते विरोधी पक्षनेते झालेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात जोडे मारो आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 08:04 PM2021-09-14T20:04:14+5:302021-09-14T20:20:42+5:30
प्रविण दरेकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केले जोडे मारो आंदोलन
पुणे : प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केलीय. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महिला चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्याचे पडसाद आता पुण्यातही उमटू लागले आहेत.
त्या विधानाच्या निषेधार्थ आज पुण्यातील बालगंधर्व चौकात प्रविण दरेकर यांच्या फोटोला राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिलांच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा मृणालिनी वाणी आणि शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “काल एका कार्यक्रमात महिलांबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी जे विधान केले आहे. त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. दरेकर यांची नगरसेवक होण्याची लायकी नाही. ते विरोधी पक्षनेते झाले आहेत,” अशा शब्दात त्यांनी दरेकर यांच्यावर निशाणा साधला.
“प्रविण दरेकर हे २००९ साली मनसेच्या आणि नंतर च्या भाजपच्या लाटेत आमदार झाले आहे. त्यामुळे अशा व्यक्तिने बोलताना भान ठेवून बोलावे. जर त्यांनी येत्या ४८ तासात केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली नाही तर महिला राज्यभर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा जगताप यांनी दिला.
आम्ही गालाचा रंग काय असतो, हे दाखवून देऊ :- राष्ट्रवादी महिलांचा इशारा
“आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात असताना. प्रविण दरेकर यांनी जे विधान केले आहे. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी. अन्यथा आम्ही गालाचा रंग काय असतो, हे दाखवून देऊ,” असा इशारा राष्ट्रवादीच्या महिलांनी दरेकर यांना दिला.