लेखन कागदावर उतरल्याशिवाय हृदयात उतरत नाही : प्रवीण दवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 02:59 AM2019-04-23T02:59:34+5:302019-04-23T02:59:39+5:30

‘लोकमत दीपोत्सवा’ला ‘छंदश्री’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा पुरस्कार

Pravin Dwana does not get hurt when writing on paper | लेखन कागदावर उतरल्याशिवाय हृदयात उतरत नाही : प्रवीण दवणे

लेखन कागदावर उतरल्याशिवाय हृदयात उतरत नाही : प्रवीण दवणे

Next

पुणे : सोशल मीडियावर स्वरचित मजकूर टाकला जातो. मात्र ते लेखन न वाचताच त्यावर ‘स्माइली’ ‘क्राइली’ टाकल्या जातात. त्या लेखनाखाली टाकलेले नाव मजकूर फॉरवर्ड करताना गायब झालेले असते. हे माध्यम प्रभावी वाटत असले तरी लिखित साहित्याला नकार दिला जातो. पण फक्त अक्षररूपच पोहोचायला हवे का? असा सवाल उपस्थित करीत, लेखन कागदावर उतरल्याशिवाय हृदयात उतरत नाही. त्यासाठी लिखित ग्रंथ आणि दिवाळी अंकाचीच आवश्यकता आहे, असे विचार प्रसिद्ध कवी आणि गीतकार प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले.

दिनमार्क पब्लिकेशनच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोमवारी आयोजित छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लोकमतच्या ‘दीपोत्सव’ तसेच ‘समदा’ दिवाळी अंकाला प्रथम क्रमांकाची फिरती ट्रॉफी प्रदान करण्यात आली. याशिवाय स्पर्धेतील विविध विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक भारत सासणे, तसेच धारिवाल इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश शेठ धारिवाल, इन्फल्कस ग्रुपचे सीएमडी शिवाजीराव चमकिरे आणि दिनमार्क पब्लिकेशन्सचे दिनकर शिलेदार उपस्थित होते.

‘छंदश्री’ हे आता शब्द कुटुंब झाले आहे. दिवाळी अंक हे अपेक्षित आणि उपेक्षितांचे व्यासपीठ आहे. हे केवळ दिवाळीपुरते मर्यादित नसून ते एक सृजनशील वार्षिक आहे, असे दवणे म्हणाले. पुरस्कारार्थी विवेक म्हेत्रे म्हणाले, की आज व्यंगचित्रकारांची दडपशाही सुरू आहे. वाचकांना चांगली व्यंगचित्रे हवी आहेत, पण रोष ओढविण्याच्या भीतीने कुणी छापण्याचे धाडस करीत नाही. असेच चालत राहिले तर अभिव्यक्तीचे काय? वाचकांची एकी नाही. त्यांनी संपादकांना कळवले तर व्यंगचित्र छापून येऊ शकते. आज भारतात केवळ १०९ व्यावसायिक व्यंगचित्रकार आहेत, जे दिवाळी अंकांनी टिकविले आहेत.

Web Title: Pravin Dwana does not get hurt when writing on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.