बनावट शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार संभाजी शिरसाटसह २८ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:10 AM2021-01-23T04:10:40+5:302021-01-23T04:10:40+5:30
पुणे : जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बनावट शिक्षक भरती घोटाळ्यात सहभागी असलेला मुख्य सूत्रधार संभाजी शिरसाट आणि सरकारी ...
पुणे : जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बनावट शिक्षक भरती घोटाळ्यात सहभागी असलेला मुख्य सूत्रधार संभाजी शिरसाट आणि सरकारी अधिकारी, संस्थाचालक आणि शिक्षक असा एकूण २८ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी (दि २२) न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश मे. नावदंर कोर्टाने हा निकाल दिला.
तत्कालीन शिक्षण मंडळाचे शिक्षण प्रमुख रामचंद्र जाधव, तत्कालीन प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत, तत्कालीन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, जिल्हा परिषद तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी दत्तात्रय शेंडकर, पिंपरी-चिंचवड मनपाच्या प्रशासकीय अधिकारी ज्योस्त्ना शिंदे आणि गोविंदराव दाभाडे यांच्यासह २८ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार आणि त्यांची टीमने या प्रकरणाचा तपास करून बोगस शिक्षक भरती गैरव्यवहार आणि सरकारी तिजोरीची लूट समोर आणली. खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे कामावर नसलेल्या शिक्षकांना नियुक्त्या दिल्याचे भासवून आणि त्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षण खात्यातील अधिकारी यांच्या संगनमताने मान्यता घेत शासनाची आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी या शिक्षक भरती घोटाळ्यातील अधिकारी, संस्था चालक व शिक्षक यांचे विरुध्द ऑक्टोबर २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी (शिक्षण) किसन दत्तोबा भुजबळ यांनी बंडगार्डन पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार भारतीय दंड विधान अंतर्गत फसवणूक, कट रचणे अशा कलमांसह भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील आरोपींनी अत्यन्त हुशारीने आणि कौशल्यपूर्ण रीतीने शासनाचा पगार घेऊन शासनालाच फसविल्याचे दिसून आले.
यांचा जामीन अर्ज फेटाळला
रामचंद्र जाधव (तत्कालीन शिक्षण उपसंचालक पुणे विभाग व तत्कालीन शिक्षण प्रकरण), मीनाक्षी राऊत (प्रशासकीय अधिकारी पुणे मनपा व तत्कालीन प्रभारी शिक्षण उपसंचालक पुणे विभाग), मुश्ताक शेख (तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे), दत्तात्रय शेंडकर (तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे), ज्योत्स्ना शिंदे (प्रशासन अधिकारी पीसीएमसी), संभाजी शिरसाठ (मुख्याध्यापक तथा शिक्षण नेता), गोविंद दाभाडे, परिमल गोविंदराव दाभाडे, अश्विनी परिमल दाभाडे, दत्तात्रय कुंजीर, अर्जुन प्रल्हाद बारगजे, मारुती हरीभाऊ नरसाळे, शुभागिणी श्रीरंग घुले, जयश्री आनंद काळे, अश्विनी अहिरराव, मंगेश अहिरे, प्रियंका वालकोळी, रोहिणी अहिरे, भारती सोनवणे, जालिंदर सातव, सीमा खेडेकर, एस. एल. वालकोळी, के. आर. महाडीक, अविनाश आखाडे, जयपाल नरखडे, अमृत नवल पाटील, सचिन अशोक बिब्बे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.