फरार असलेल्या मुख्य आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:12 AM2021-09-19T04:12:41+5:302021-09-19T04:12:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: चिंचवड येथील अल्पवयीन पीडित मुलीवर तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची आणि शरीरसंबंधांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: चिंचवड येथील अल्पवयीन पीडित मुलीवर तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची आणि शरीरसंबंधांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत केलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात, फरार असलेल्या मुख्य आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एस.पी. पोंक्षे यांनी हा आदेश दिला.
गौरव वाघमारे उर्फ नन्या (रा.चिंचवड) असे अटकपूर्व जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह या गुन्ह्यात सहआरोपी असलेल्या १७ वर्षीय मुलाचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. या दोघांसह आणखी दोन अल्पवयीन मुलांवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे.
आरोपींनी अल्पवयीन पीडित मुलगी व तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची आणि शरीरसंबंधांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर, आरोपींनी पाच ते सात मुलांच्या टोळक्यासह फिर्यादीच्या घरी जाऊन तलवारी आणि लाकडी दांडक्यांचा धाक दाखवून पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत, शिवीगाळ करून दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गौरव वाघमारे उर्फ नन्या व सहआरोपी असलेल्या मुलाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. जामिनासाठी अर्ज केलेला मुख्य आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून, त्याच्याविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. त्याची या परिसरात दहशत असून, अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास, तो पीडिता व साक्षीदारांना धमकावून पुरावे नष्ट करू शकतो, तसेच पीडितेचे व्हिडीओ व्हायरल करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा युक्तिवाद सरकारी वकील लीना पाठक यांनी करत आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती केली. न्यायालयाने ती मान्य केली. चिंचवड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक नीता उबाळे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
.....