कोरोना घोटाळ्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 09:38 AM2023-12-14T09:38:58+5:302023-12-14T09:39:35+5:30
प्रत्यक्षात अधिकाऱ्यांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या वैद्यकीय साहित्याची परस्पर खासगी रोगनिदान केंद्र चालकांना विक्री करून ८० ते ९० लाखांची फसवणूक केली असल्याचा आरोप होता
वारजे : वारजे येथील पुणे महानगरपालिकेच्या बारटक्के रुग्णालयातील कोरोना कीट घोटाळा प्रकरणात आरोग्य अधिकारी डॉ. अरुणा तारडे यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी डॉ. अरुणा तारडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी फिर्यादी डॉ. सतीश कोळसुरे यांनी न्यायालयात धाव घेत, तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वारजे पोलिस ठाण्यात मागील महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वारजे भागात पुणे महानगरपालिकेचे कै. अरविंद बारटक्के रुग्णालय आहे. २०२१ मध्ये कोरोना काळात बारटक्के रुग्णालयात कोरोना चाचणी साहित्य, औषधे, जंतुनाशक तसेच अन्य वैद्यकीय साहित्य पुरवण्यात आले होते. बारटक्के रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा सूर्यकांत तारडे व डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी यांनी नागरिकांच्या कोरोना चाचणीबाबत बनावट नोंदी केल्या, असा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्षात त्यांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या वैद्यकीय साहित्याची परस्पर खासगी रोगनिदान केंद्र चालकांना विक्री करून ८० ते ९० लाखांची फसवणूक केली असल्याचा आरोप होता.
या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी डॉ. अरुणा तारडे यांनी दिलेल्या ॲड. सतीश कांबळे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला होता. डॉ. तारडे हे सरकारी नोकर (महिला वैद्यकीय अधिकारी ) असताना, त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश हे सरकारची संमती असल्याशिवाय घेता येत नाही, असा युक्तिवाद बचावपक्षातर्फे ॲड. सतीश कांबळे यांनी केला. न्यायालयाने बचावपक्षाचा युक्तिवाद मान्य करत, डॉ. अरुणा तारडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तूर्तास तरी डॉ. अरुणा तारडे यांच्या डोक्यावरील अटकेची टांगती तलवार टळली आहे.