पावसाच्या आशेने माॅन्सूनपूर्व कामांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:09 AM2021-05-22T04:09:55+5:302021-05-22T04:09:55+5:30
कळस : सूर्याचा रोहिणी नक्षत्रात यावर्षी मंगळवार (दि २५) रोजी प्रवेश होत आहे. रोहिणी नक्षत्रात यंदाचा ...
कळस : सूर्याचा रोहिणी नक्षत्रात यावर्षी मंगळवार (दि २५) रोजी प्रवेश होत आहे. रोहिणी नक्षत्रात यंदाचा मॉन्सून बरसेल या आशेने शेतकऱ्यांनीही त्यांच्या शेतीच्या माॅन्सूनपूर्व कामांना सुरुवात केली आहे. अंगाची काहिली करणाऱ्या या उन्हाळ्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे ती पहिल्या पावसाची.
तोक्ते चक्रीवादळामुळे माॅन्सूनने गती घेतली असून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर दाखल होत आहे. तेथून माॅन्सून बंगालच्या उपसागरातून प्रवास करत केरळात दाखल होईल. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत ईशान्येकडील राज्यांत दाखल होऊन महाराष्ट्रात दाखल होत असतो. आगामी काही दिवसांत मोसमी पावसाचे राज्याच्या किनारपट्टीच्या भागात आगमन होईल. यानंतर पाऊस राज्यातील काही भागात येत असतो. एरवी बघावी लागणारी पावसाची वाट यंदाही पहावी लागणार आहे. धरणातील पाणी कमी होत असल्याने प्रशासनालाही पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस आजही पंचांगातील पावसाची पारंपरिक नक्षत्रे, त्यांची वाहने, तसेच पक्ष्यांची झाडावरील घरटी यावरूनच पावसाचा अंदाज बांधत असतो. त्यानुसारच शेतीच्या कामांना सुरुवात करतो. यंदा रोहिणी नक्षत्रात पहिला पाऊस बरसतो का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अंगाला भाजून काढणाऱ्या उन्हाचा अनुभव घेतल्यानंतर आता वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली आहे.
चौकट
पंचांगानुसार पावसाची एकूण बारा नक्षत्रे आहेत. त्यानुसार नक्षत्राचे वाहन, पाऊसमान अंदाज सांगितला आहे. यावर्षी २५ मेला रोहिणी नक्षत्र सुरु होत आहे. ८ जून रोजी सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होत असून, त्याचे वाहन गाढव आहे. अल्प पाऊस होईल. तर २१ जूनपासून आर्द्रा नक्षत्र लागत असून त्याचे वाहन कोल्हा आहे. तुरळक स्वरूपाचा पाऊस असेल. ५ जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू होत आहे. वाहन उंदीर आहे. कमी अधिक प्रमाणात पाऊस. १९ जुलैपासून सुरू होणाऱ्या पुष्य नक्षत्राचे वाहन घोडा आहे. चांगला पाऊस होईल. २ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आश्लेषा नक्षत्राचे वाहन मोर आहे. पावसाचे प्रमाण जास्त असेल. १६ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मघा नक्षत्राचे वाहन गाढव आहे. चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल. पूर्वा फाल्गुनी ३० ऑगस्टला निघणार आहे. वाहन बेडूक आहे. चांगला पाऊस होईल. उत्तरा फाल्गुनी १३ सप्टेंबर रोजी आहे. वाहन म्हैस आहे. साधारण पाऊस होईल. २७ सप्टेंबर हस्त नक्षत्र सुरू होत आहे, वाहन घोडा आहे. खंडित पाऊस पडेल. १० ऑक्टोबर चित्रा नक्षत्र लागत आहे. वाहन मोर आहे. वादळासह पाऊस असेल. २३ ऑक्टोबरला स्वाती नक्षत्र सुरू होत आहे. वाहन गाढव आहे. तुरळक पाऊस व्यक्त करण्यात आला आहे.