पूर्व प्राथमिकच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात, ७ महिने अगोदरच पालकांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 02:34 AM2018-11-11T02:34:47+5:302018-11-11T02:35:07+5:30

इंग्रजी माध्यमाच्या शाळा : ७ महिने अगोदरच पालकांची धावपळ

Pre-primary admissions begin, 7 months ago the parents' runway | पूर्व प्राथमिकच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात, ७ महिने अगोदरच पालकांची धावपळ

पूर्व प्राथमिकच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात, ७ महिने अगोदरच पालकांची धावपळ

Next

पुणे : शहरातील प्रमुख इंग्रजी माध्यमाच्या शाळांत दर वर्षीप्रमाणेच यंदाही पूर्व प्राथमिकच्या (प्ले ग्रुप, नर्सरी, केजी) प्रवेशप्रक्रियेला नोव्हेंबर महिन्यापासून सुरुवात होत आहे. अनेक शाळांच्या संकेतस्थळावर प्रवेशाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. जून २०१९मध्ये शाळेला सुरुवात होणार असताना ७ महिने अगोदरच पालकांना प्रवेशाची धावपळ करावी लागत आहे.

शहरातील प्रमुख इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील प्रवेशक्षमता आणि प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी यांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. अनेक पालकांना नामांकित असलेल्याच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा असतो. त्यातुलनेत इंग्रजी शाळांमधील प्रवेशाच्या जागा कमी आहेत. त्यामुळे आपल्या चिमुकल्याला शाळेत प्रवेश मिळवून देणे, हे पालकांसमोर मोठे आव्हान बनले आहे. स्पर्धेच्या या युगात अगदी १७-१८ महिन्यांच्या बाळालाही प्ले ग्रुपमध्ये प्रवेश दिला जात आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक स्तरावर प्रवेशासाठीची विशिष्ट वयोमर्यादा ठरवून दिली आहे; मात्र खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून त्याचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. पालकही त्याला बळी पडत आहेत.

शहरातील प्रमुख शाळांच्या संकेतस्थळावर प्रवेशाच्या सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. संकेतस्थळावर प्रवेश अर्ज आॅनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर नर्सरीच्या प्रवेशासाठी किती जागा उपलब्ध आहेत, याची माहिती देण्यात आली आहे. काही शाळांनी संकेतस्थळावरील प्रवेश अर्ज भरून शाळेत जमा करण्याबाबत सूचना केल्या आहेत. प्ले ग्रुप, नर्सरी, केजी या पूर्व प्राथमिकच्या शिक्षणासाठी शासनाची कोणतीही नियमावली किंवा कायदा नाही. पूर्व प्राथमिकच्या शाळा सुरू करण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. त्याचबरोबर प्रवेशासाठी वयोमर्यादा किती असावी, शुल्क किती असावे, याबाबतही कुठलेच नियम नाहीत. शाळांमधील जागा कमी आणि विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने शाळांकडून शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली जात आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून विद्यार्थ्यांना अनेक सेवासुविधा दिल्या जात असल्याचा देखावा केला जातो; प्रत्यक्षात मात्र दर्जाबाबत अनेक प्रश्न असतात. अप्रशिक्षित शिक्षक पूर्व प्राथमिकच्या वर्गावर शिकविण्यासाठी असतात. शहरात अनेक ठिकाणी नामांकित नर्सरी व प्ले ग्रुपच्या शाखा सुरू झाल्या; मात्र अचानक काही कारणांमुळे त्या अर्ध्यातूनच बंद झाल्या. संपूर्ण वर्षाचे शुल्क भरले असताना मध्येच त्या बंद झाल्याने तक्रार कुठे करायची, कारवाईचे अधिकार कुणाला, याबाबत पालकांना माहिती मिळत नाही.

इंग्रजी माध्यमाचा हट्ट अनाठायी
आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्याच शाळेत घालण्याचा निश्चिय उच्च, मध्यम व कनिष्ठ अशा सर्व स्तरांमधील पालकांकडून करण्यात येतो. मात्र, प्रमुख इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील प्रवेशाच्या जागांची संख्या कमी आहे. या शाळांमध्ये प्रवेश न मिळाल्यान नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या दुय्यम दर्जाच्या इंग्रजी शाळांमध्ये पालकांकडून प्रवेश घेतला जातो. मात्र, या शाळांचा दर्जा चांगला नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे पालकांनी इंग्रजी माध्यमामध्येच प्रवेश घेण्याचा अनाठायी हट्ट न करता सेमी इंग्रजी माध्यमांचा विचार करावा, असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून वेळोवेळी व्यक्त करण्यात येते.

पूर्व प्राथमिकच्या कायद्याचा विसर
पूर्व प्राथमिकसाठी (प्ले ग्रुप, नर्सरी, केजी) नियमावली तयार करून त्याबाबतचा कायदा करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येऊन ४ वर्षे उलटली.
मात्र, त्यानंतर शासनस्तरावर काहीच
हालचाल करण्यात आली नाही. पूर्व प्राथमिकचा कायदा करण्याबाबत वारंवार मागणी करूनही त्याबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही.

Web Title: Pre-primary admissions begin, 7 months ago the parents' runway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.