आंबेगावच्या आदिवासी भागात पोलीस भरतीपूर्व सराव परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:11 AM2021-02-15T04:11:35+5:302021-02-15T04:11:35+5:30
डिंभे : आदिवासी क्रांती संघटना, असाणे यांच्या सहकार्यातून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पोलीस भरतीपूर्व लेखी सराव परीक्षा पार पडली. ...
डिंभे :
आदिवासी क्रांती संघटना, असाणे यांच्या सहकार्यातून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पोलीस भरतीपूर्व लेखी सराव परीक्षा पार पडली. असाणे व तळेघर या ठिकाणी या परीक्षा घेण्यात आल्या. अनेक ठिकाणांहून आलेल्या विद्यार्थ्यांचा या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आदिवासी भागातील तरुणवर्ग पोलीस भरतीसाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक असतात. ग्राउंड लेव्हला हे उमेदवार अनेकदा यशस्वी होतात. मात्र, लेखी स्वरूपातील परीक्षामध्ये हे उमेदवार मागे पडतात. लेखी स्वरूपातील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असते, कोण-कोणत्या विषयांवर प्रश्न असतात व त्याचे गुणांकन याची माहिती उमेदवारांना होण्यासाठी ही परीक्षा आयोजित केली होती.
परीक्षेसाठी दोन केंद्रे निवडली गेली होती. तळेघर आणि असाणे या दोन्ही ठिकाणी एकूण ८६ उमेदवार उपस्थित होते. कोरोना नियमावलीचे पालन करत परीक्षा घेण्यात आली. आदिवासी क्रांती संघटनेने असाणे केंद्रावरील विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची सोय केली होती. पोलीस भरतीच्या धर्तीवर राबविलेली ही सराव लेखी परीक्षा योग्य पध्द्तीने पार पडली. सराव लेखी परीक्षेचे नियोजन आदिवासी क्रांती संघटना, असाणे या संघटनेचे सदस्य सुरेश सुपे, सागर गभाले, पेवजी मोहरे, दत्तात्रय गभाले, दत्तात्रय ढवळे, सागर ठुबल, नारायण गवारी, गणेश गभाले, सचिन दगडे, राजेंद्र गभाले, रविंद्र गभाले, समीर गभाले, प्रशांत गभाले, रामदास ढवळे, दशरथ भांगले, सचिन बांबळे, अमोल ठुबल, राजाराम आंबवणे, किसन मोरे,अमोल ढवळे यांनी केले होते.
फोटो : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पोलीस भरती पूर्व सराव परीक्षा केंद्रावर सराव परीक्षा देताना उमेदवार.