भाविक-नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:23 AM2018-06-21T02:23:51+5:302018-06-21T02:23:51+5:30
संत ज्ञानेश्वरमहाराज पालखीचे आषाढी पायीवारी सोहळ्यास आळंदीतून ६ जुलैला हरिनाम गजरात प्रस्थान होत आहे.
आळंदी : संत ज्ञानेश्वरमहाराज पालखीचे आषाढी पायीवारी सोहळ्यास आळंदीतून ६ जुलैला हरिनाम गजरात प्रस्थान होत आहे. यानिमित्त तीर्थक्षेत्र आळंदीत देवस्थान, आळंदी नगरपरिषद, महसूल, पोलीस आणि आरोग्यसेवेच्या प्रशासनाने श्रींच्या पालखी सोहळ्याच्या तयारीची सुरुवात केली आहे.
यानिमित्त आळंदी देवस्थानचे विश्वस्त अजित कुलकर्णी यांनी देवस्थानच्यावतीने केलेल्या तयारीचा आढावा, मागण्या, सूचना खेडचे प्रांत आयुष प्रसाद यांनी बोलाविलेल्या बैठकीत व्यक्त केल्या. यावेळी भाविकांची, तसेच नागरिकांच्या सुरक्षेची काळजी इंद्रायणी नदीघाटासह सर्वत्र घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सुरक्षितता, शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी मंदिरासह इंद्रायणी नदी परिसरात जास्त पोलीस बंदोबस्त ठेवण्याची त्यांनी मागणी केली.
>२४ तास आरोग्यसेवा तैनात
आळंदी देवस्थानने सोहळाकाळात मंदिर परिसरात २४ तास आरोग्यसेवा कार्यरत राहील, याची काळजी घेण्याची सूचना केली. देवसंस्थानची रुग्णवाहिकासेवा सुरू आहे.याशिवाय शासकीय आरोग्यसेवा पथक तैनात ठेवण्यात येणार आहे, यासाठीही मागणी केली आहे.यात्राकाळात देवस्थानची पाणीपुरवठा योजना २४ तास सेवा देणार आहे. मात्र वीजपुरवठा खंडित होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्तकरण्यात आली आहे. वीजपुरवठ्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असल्याने काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. इतर पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने टँकर, रुग्णवाहिका आणि अग्निसुरक्षा वाहन आणि सेवा सुसज्ज ठेवण्याची मागणी विश्वस्त अजित कुलकर्णी यांनी केली.आळंदी देवस्थान, आळंदी नगरपरिषद, आरोग्यसेवा, महावितरण, सार्वजनिक प्रवासी वाहतूकसेवा, संपर्क यंत्रणा, महसूल आणि पोलीस प्रशासन यांनी प्रांत आयुष प्रसाद यांनी नियोजनपूर्व आढावा
बैठकीत सादर केलेल्या अहवालाप्रमाणे कामकाज करण्यास सुरुवात केली आहे. आळंदी परिसरात श्रींच्याप्रस्थानच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे.आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, पालखी सोहळाप्रमुख विकास ढगे-पाटील, तसेच सर्व विश्वस्त आणि जिल्हा प्रशासन यांचे मार्गदर्शक सूचनाप्रमाणे तयारी मंदिरात सुरू केली आहे. प्रस्थानकाळात मंदिरासह परिसरात भाविकांची, तसेच नागरिकांची सुरक्षितता यास नियोजनात प्राधान्य देण्यात येत असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
>प्रस्थानदिनी परंपरेने केवळ ४७ दिंड्यांना प्रवेश
श्रींच्या पालखीचे वीणामंडपातून ६ जुलैला प्रस्थान आहे. यासाठी मंदिरात परंपरेने श्रींच्या रथापुढील १ ते २७ आणि श्रींच्या रथामागीलकेवळ १ ते २० अशा ४७ दिंड्यांसह श्रींचे २ अश्व मंदिरात प्रवेशणार आहेत. यावर्षी दिंड्यांमधील वारकऱ्यांची संख्यादेखील मर्यादित ठेवण्याची पोलीस प्रशासनाने सूचना केली आहे. श्रींच्या पालखी सोहळा प्रस्थानकाळात भाविकांची दर्शनव्यवस्था राम वाड्याच्या नवीन दर्शनमंडपात करण्यात आली आहे. दर्शनबारी इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलावरून पुढे इंद्रायणी नदीपलीकडे जाईल. इंद्रायणी नदीवरील पुलावर पाणी असल्यास दरम्यान दर्शनबारी रांग शनी मारुती मंदिरामार्गे मोठ्या पुलावरून पलीकडे नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.श्रींच्या पालखीचे ६ जुलैला प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम आळंदीतील श्रींच्या आजोळघरी (जुन्या गांधी वाड्यात) नवीन दर्शनबारी मंडपात होणार आहे. तत्पूर्वी श्रींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा, महाद्वारातून नगरप्रदक्षिणा सुरू होईल. हजेरी मारुती मंदिर, चावडी चौकमार्गे श्रींची पालखी पहिल्या मुक्कामास आजोळघरी येणार आहे. दरम्यान, रात्रीची प्रदक्षिणा असल्याने या मार्गावर प्रकाशव्यवस्था प्रभावी ठेवण्याची मागणी देवस्थानने केली आहे.
>मंदिर परिसरात देवस्थानचे ६४ सीसीटीव्हीकॅमेरे
मंदिर परिसरात देवस्थानचे ६४ सीसीटीव्हीकॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याशिवाय मंदिरातील धार्मिक उपक्रम, प्रस्थान सोहळा मंदिराबाहेर भाविकांना पाहता यावा, यासाठी थेट प्रक्षेपण स्क्रीन यंत्रणा चहूबाजूने कार्यरत ठेवण्यात येणार आहे.देवस्थानने विकसित केलेल्या नवीन दर्शन मंडपातदेखील सीसीटीव्हीकॅमेरे बसविण्यात येणार आहेत. संवाद संपर्क मोहिमेत वॉकीटॉकीच्या यंत्रणेचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
>मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई
श्रींच्या पालखी प्रस्थानानिमित्त आळंदी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि पुष्पसजावट करण्यात येणार आहे.
यात मंदिरपरिसरात अखंड वीजपुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय संस्थानने जनसेट तैनात केले आहेत.
महावितरणने प्रस्थानकाळात भारनियमन करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.