रखडवलेल्या गुणपत्रिका एका दिवसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:28 AM2017-08-19T01:28:07+5:302017-08-19T01:28:10+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन शाखेत (एमबीए) प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाला शिकणा-या हजारो विद्यार्थ्यांच्या एक वर्षापासून रखडलेल्या गुणपत्रिका अखेर एका दिवसात छपाई करून महाविद्यालयांना वितरित करण्यात आल्या आहेत.
दीपक जाधव ।
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन शाखेत (एमबीए) प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाला शिकणा-या हजारो विद्यार्थ्यांच्या एक वर्षापासून रखडलेल्या गुणपत्रिका अखेर एका दिवसात छपाई करून महाविद्यालयांना वितरित करण्यात आल्या आहेत. आॅनलाइन निकाल लागल्यानंतर कागद खरेदी झाली नसल्याने गुणपत्रिकांची छपाईच झाली नसल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले होते.
विद्यापीठामध्ये परीक्षा विभाग हा अत्यंत संवेदनशील मानला जातो. निकाल प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. मात्र कागद खरेदी वेळेवर न करण्यात आल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत सापडले होते. याबाबतचे वृत्त बुधवारी लोकमतने प्रकाशित केले होते. त्यानंतर मात्र सुस्तावलेल्या यंत्रणेने वेगाने पावले टाकून एका दिवसात निकाल महाविद्यालयांना दिला आहे. वर्षभर रखडलेले छपाईचे काम पतेतीची सुटी असतानाही दिवस-रात्र राबून एका दिवसात पूर्ण करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत १२० एमबीएच्या महाविद्यालयांमध्ये दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एमबीए प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्राचा आॅनलाइन निकाल नोव्हेंबर २०१६ मध्ये जाहीर करण्यात आला. त्यानंतर एमबीएच्या दुसºया सत्र परीक्षेचा निकाल मे २०१७ मध्ये आॅनलाइन जाहीर करण्यात आला. मात्र गेल्या वर्षभरापासून कागद उपलब्ध नसल्याने गुणपत्रिकांची छपाईच होऊ शकलेली नव्हती. त्यामुळे त्याचे वाटपच होऊ शकले नव्हते.
गुणपत्रिका मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत सापडले होते. अनेक विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेता येत नव्हता. एमबीए महाविद्यालयांचे प्रशासन व विद्यार्थ्यांकडून सातत्याने गुणपत्रिका मिळण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली होती.
परीक्षा विभागातील अनेक प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. इंजिनिअरिंग व आर्किटेक्ट
कॉलेजचे अनेक विद्यार्थी परीक्षेला हजर असतानाही त्यांना गैरहजर दाखवून अनुत्तीर्ण करण्यात
आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच उजेडात आला होता. त्याचबरोबर वेतन मिळत असतानाही अधिकचा प्रोत्साहन भत्ता बेकायदेशीररीत्या उचलला जात असल्याचे उजेडात आले आहे. यामुळे परीक्षा विभागाची विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
परीक्षा विभागात सुधारणा व्हाव्यात, यासाठी विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंकडे निवेदने दिली आहेत. येत्या काही दिवसांत यामध्ये बदल न झाल्यास परीक्षा विभागाचे कामकाज चालू देणार नाही, इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.
>गुणपत्रिका मिळाल्या, पण कारवाईचे काय?
एक वर्षानंतर गुणपत्रिका तर मिळतील मात्र तरीही काही प्रश्न अजून अंधारीच आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास एखादा दिवस उशीर केला तर त्यांच्याकडून लेट फी घेतली जाते. त्याचवेळी गुणपत्रिका देण्यास एक वर्षाचा विलंब लावून त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणाºया अधिकाºयांवर काय कारवाई केली जाणार, याची विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. परीक्षा विभागाच्या गैरप्रकारांच्या चौकशीसाठी यापूर्वीच एकसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. आता या पार्श्वभूमीवर कुलगुरू काय भूमिका घेतात, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.