बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज; राज्यात अवकाळी पाऊस घटण्याची शक्यता
By नितीन चौधरी | Published: May 3, 2023 05:59 PM2023-05-03T17:59:17+5:302023-05-03T18:04:06+5:30
बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे राज्यात असलेली आर्द्रता कमी होऊन पाऊस घटणार
पुणे: येत्या ७ व ८ मेरोजी बंगालच्या उपसागरात चक्रावाताची अर्थात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. याचा राज्याला फायदाच होणार असून अवकाळी पाऊस घटणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात पुढील चार दिवस यलो अलर्ट असेल. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पाचव्या दिवशी अर्थात ७ तारखेनंतर पावसाची शक्यता कमी होईल
याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, ‘’दक्षिण पश्चिम मध्य प्रदेशपासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत एक द्रोणिका रेषा अर्थात हवेची विसंगती तयार झाली आहे. तसेच दक्षिण छत्तीसगडवर हवेचा एक चक्रावात तयार झाला आहे. ईशान्य बंगालच्या उपसागरावर ६ तारखेच्या सुमारास एक चक्रावात तयार होण्याची शक्यता आहे. सात तारखेला याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होईल, तर ८ तारखेला हे कमी दाबाचे क्षेत्र वाढेल. त्यानंतर याची तीव्रता आणखी वाढून चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्याची दिशा उत्तरेकडे असण्याची शक्यता आहे.’’
परिणामी पुढील ७२ तासांत अवकाळी पावसाची तयार झालेली स्थिती कमी होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे राज्यात असलेली आर्द्रता कमी होऊन पाऊस घटणार आहे. तसेच तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, पाच तारखेनंतर आर्द्रता कमी झाल्याने कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. पुढील दोन दिवसांसाठी अवकाळी पाऊस कमी होणार आहे.
पुणे जिल्ह्यात पुढील चार दिवस यलो अलर्ट असेल. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पाचव्या दिवशी अर्थात ७ तारखेनंतर पावसाची शक्यता कमी होईल, अशी माहिती त्यांनी दिली.