जन्माअगोदरच बाळाच्या आजारांची भाकिते शक्य
By admin | Published: January 20, 2016 01:30 AM2016-01-20T01:30:26+5:302016-01-20T01:30:26+5:30
बायोइन्फॉरमेटिक्सच्या क्षेत्रात जगात वेगाने अत्याधुनिक संशोधन केले जात आहे. मात्र, त्या तुलनेत भारतातील संशोधन खूपच मागे आहे.
पुणे : बायोइन्फॉरमेटिक्सच्या क्षेत्रात जगात वेगाने अत्याधुनिक संशोधन केले जात आहे. मात्र, त्या तुलनेत भारतातील संशोधन खूपच मागे आहे. पण भारतातील या क्षेत्रातील काही संस्था त्यावर चांगले संशोधन करीत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत या तंत्रज्ञानामुळे बाळ जन्माला येण्याअगोदरच त्याला होणाऱ्या आजारांची भाकिते वर्तविता येऊ शकतील, अशी माहिती पश्चिम बंगालमधील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ बायोमेडिकल जिनॉमिस (एनआयबीएमजी) संस्थेचे संचालक पार्थ मुजुमदार यांनी दिली.
सेंटर फॉर डेव्हलपिंग आॅफ अॅडव्हान्स कम्युटिंग (सीडॅक), बायो इन्फॉर्मेटिक्स व बायोइन्फॉर्मेटिक्स रिसोर्स अॅन्ड अॅप्लिकेशन फॅसिलिटी (बीआरएएफ) यांनी ‘अॅसलरेटिंग बायोलॉजी’ या विषयावर आयोजित केलेल्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी केंद्र शासनाच्या बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन सिस्टिम नेटवर्कचे अध्यक्ष आलोक भट्टाचार्य, सीडॅकचे महासंचालक रजत मुना, संचालक हेमंत दरबारी, राजेंद्र जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुजुमदार म्हणाले, की बायोलॉजी व त्याच्याची निगडित सर्व क्षेत्रांतील सर्व डाटांचे डिजिटलायझेशन होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याकडे सुपरकॉम्प्युटर उपलब्ध आहेत. हा सर्व डाटा संशोधनासाठी आणि अभ्यासासाठी देशस्तरावर उपलब्ध व्हायला हवा. उपलब्ध होणारा डाटा आणि त्यावर होणारे प्रोसेसिंग यांचा वेग वाढायला हवा आणि त्यासाठी असे अॅप्लिकेशन्स निर्माण होणे गरजेचे आहे. या डाटांच्या माध्यमातून बायोमेडिकल जिनॉमिसवर बरेच संशोधन केले जाऊ शकते. याचा प्रयत्न
आमच्या एनआयबीएमजी संस्थेत
सुरू आहे. त्यामुळे आई-वडील
आणि एकूणच कुटुंबांतील
व्यक्तींच्या माहितीच्या आधारे
जन्माला येण्याअगोदरच बाळाला काय आजार आहेत, होऊ शकतात याचे
भाकीत करता येईल आणि ते रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, तो होऊ नये म्हणून काय करता येईल, यावर लक्ष केंद्रित करता येईल.
भट्टाचार्य म्हणाले, की बायोइन्फॉर्मेटिक्स क्षेत्रात सध्या
कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. या क्षेत्रात येणारे सर्व विद्यार्थी हे बायोलॉजीचे शिक्षण घेऊन आलेले असतात. परंतु, त्यांना त्याचे ज्ञानच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या संशोधनात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी शिक्षण व्यवस्थेतही बदल करणे गरजेचे आहे. रजत मुना यांनी मनोगत व्यक्त केले.