उड्डाणपुलांच्या बांधणीला प्राधान्य
By admin | Published: March 17, 2017 02:31 AM2017-03-17T02:31:55+5:302017-03-17T02:31:55+5:30
शहराचा वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, त्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्याचा
पुणे : शहराचा वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, त्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे नवनिर्वाचित सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी गुरुवारी सांगितले. त्याचबरोबर पिंपरी-सांडस येथील कचरा प्रकल्पाची जागा हस्तांतरण, जायका प्रकल्पाची अंमलबजावणी आदी प्रश्नांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही भिमाले यांनी दिली.
महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी भाजपाचे गटनेते श्रीनाथ भिमाले यांची सभागृह नेतेपदी निवड केल्याचे पत्र त्यांना दिले. या वेळी शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक मुरली मोहोळ उपस्थित होते. त्यानंतर भिमाले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भिमाले यांनी सांगितले, ‘‘शहरात वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे, त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सुरू असलेल्या उड्डाणपुलांचे काम लवकर मार्गी लावले जाईल. त्याचबरोबर रहदारीच्या ठिकाणी आणखी उड्डाणपुलांची उभारणी केली जाणार आहे. उड्डाणपुलांसाठी राज्य शासनाकडून निधी मिळविला जाणार आहे.’’
पिंपरी-सांडस येथील जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव गेल्या ४ महिन्यांपासून राज्य शासनाकडे प्रलंबित आहे, त्याला कधी मंजुरी मिळणार, याची भिमाले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, ‘‘पिंपरी-सांडसच्या जागेबाबत मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे, लवकरच त्याला शासनाची मंजुरी मिळेल.’’
जायका प्रकल्पासाठी पर्यावरण सचिवांची सही झालेली नाही, त्यामुळे तो पुढे सरकू शकला नसल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी या वेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)