घोरपडी रेल्वे उड्डाणपुलाला प्राधान्य

By Admin | Published: October 23, 2014 05:04 AM2014-10-23T05:04:45+5:302014-10-23T05:04:45+5:30

शहरी भाग असून पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. घोरपडी गाव आणि बाजारपेठ परिसरातील नागरिकांना सर्वाधिक भेडसावणा-या रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न सोडविण्याला मी प्राधान्य देणार आहे

Prefer to the Ghorpadi Railway Flyover | घोरपडी रेल्वे उड्डाणपुलाला प्राधान्य

घोरपडी रेल्वे उड्डाणपुलाला प्राधान्य

googlenewsNext

पुणे : शहरी भाग असून पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. घोरपडी गाव आणि बाजारपेठ परिसरातील नागरिकांना सर्वाधिक भेडसावणा-या रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न सोडविण्याला मी प्राधान्य देणार आहे. त्यादृष्टीने आजच केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री राव इंदरजित सिंह यांच्याशी बोलणे झाले असल्याचे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार दिलीप कांबळे यांनी सांगितले़
कांबळे यांनी आज लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली़ ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी त्यांचे स्वागत केले़ या वेळी मतदारसंघातील प्रश्न आणि भावी योजना याविषयी त्यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला.
या वेळी डॉ. शिवाजीराव सरोदे, रवींद्र पाटील, हरीश भाबड आणि प्रवीण ओसवाल उपस्थित होते.
कांबळे म्हणाले, ‘‘घोरपडी गाव व मुंढवा येथून दोन रेल्वेमार्ग जातात़ दिवसातील १२ तासांपैकी किमान ६ तास हे रेल्वे फाटक बंद असते़ फाटक बंद असल्याने नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक यांना खूप त्रास सहन करावा लागतो़ अनेकदा रुग्णवाहिकाही त्यात अडकून पडते़ हा उड्डाणपूल व्हावा, याला मी प्राधान्य दिले असून राव इंदरजित सिंह पुण्यात आले असता त्यांना निवेदन दिले होते़ त्या वेळी त्यांनी आचारसंहिता संपल्यावर यावर कार्यवाही करू, असे आश्वासन दिले़ आज त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलल्यावर त्यांनी हे निवेदन संबंधित विभागात पुढील कार्यवाहीसाठी दिले आहे.
खासदार अनिल शिरोळेही केंद्रीय पातळीवरून या विषयाचा पाठपुरावा करीत आहेत़ पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि वडगाव शेरी या तिन्ही मतदारसंघांतील नागरिकांच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. येथील भाजपचे तिन्ही आमदार त्याचा एकत्रितपणे पाठपुरावा करू. या उड्डाणपुलाजवळ सरंक्षण खात्याची काही संवेदनशील कार्यालये असल्याचे सांगण्यात येत आहे. ती अन्यत्र हलवून इतर कार्यालये येथे आणावीत, असा प्रस्ताव संरक्षण विभागाला दिला आहे. सर्व अडथळे पार करून हा उड्डाणपूल लवकरात लवकर होईल, याला प्राधान्य देणार आहे़ ’’
ते पुढे म्हणाले, ‘‘पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात झोपडपट्टीवासीयांची संख्या मोठी आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए) नियमावलीमध्ये अनेक त्रुटी आहेत़ त्या दूर करून तिच्या अंमलबजावणीला गती देण्याचा प्रयत्न असणार आहे. या योजनेतून बांधकाम व्यावसायिकांपेक्षा नागरिकांचा जास्त फायदा व्हावा, अशी आपली भूमिका आहे.’’
विजयाविषयी कांबळे म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीला सुरुवात झाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध प्रचार केला. आपणही निवडणुकीत भपका दाखविण्यापेक्षा सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्यासाठी प्रयत्न केला.
बूथवाईज नियोजन केले. त्यामुळे मतदारसंघात घरोघरी पोहोचणे शक्य झाले. याबरोबरच केंद्र सरकारबाबत सकारात्मक प्रतिमा होती.’’
(प्रतिनिधी)

Web Title: Prefer to the Ghorpadi Railway Flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.