बाधितांना रस्त्यालगत व्यवसायास प्राधान्य द्यावे
By admin | Published: May 25, 2017 03:02 AM2017-05-25T03:02:21+5:302017-05-25T03:02:21+5:30
प्रस्तावित खेड-सिन्नर या रस्त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. जुन्या रस्त्यालगतचे व्यवसाय बंद पडणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर : प्रस्तावित खेड-सिन्नर या रस्त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. जुन्या रस्त्यालगतचे व्यवसाय बंद पडणार आहेत. जे बाधित शेतकरी आहेत त्यांना नवीन रस्त्यालगत व्यवसाय सुरू करण्यासाठी प्राधान्य द्यावे. भोसरी, चाकण, राजगुरूनगर या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे
डॉ. प्रमोद बाणखेले यांनी केली आहे.
डॉ. बाणखेले यांनी दिल्ली येथे जाऊन गडकरी यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे-नाशिक महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, मंचर परिसरात आत्तापर्यंत ४ वेळा भूसंपादन झाले आहे. नवीन रस्ता झाल्यानंतर जुन्या रस्त्यावरील अनेक उद्योग व्यवसाय बंद होणार आहेत. नवीन रस्त्यालगत व्यवसाय सुरू करताना या दुकानदारांना प्राधान्य देऊन त्यांचे व्यवसाय सुरू करण्यात यावे. भोसरी, चाकण, राजगुरुनगर या भागात दररोज वाहतूककोंडी होते. त्याचा त्रास प्रवासी व वाहनचालकांना होतो, ही समस्या दूर करण्यासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे.
चाकण येथे उड्डाणपूल तातडीने तयार करण्यात यावा, अशी मागणी डॉ. बाणखेले यांनी केली. त्यावर उड्डाणपुलासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन गडकरी
यांनी दिले.