ऑफलाइनपेक्षा ऑनलाईन परीक्षेला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:12 AM2021-05-10T04:12:10+5:302021-05-10T04:12:10+5:30
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यापीठांना सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावे लागत आहेत. मात्र, ऑफलाईन परीक्षेपेक्षा विद्यार्थी ऑनलाईन ...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यापीठांना सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावे लागत आहेत. मात्र, ऑफलाईन परीक्षेपेक्षा विद्यार्थी ऑनलाईन परीक्षांना अधिक उपस्थिती लावत असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निदर्शनास आले आहे. परीक्षा ऑनलाईन होत असल्या, तरी विद्यापीठाने सुमारे ४०० विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान गैरप्रकार करताना पकडले आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांमधील संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा १० एप्रिल रोजी सुरू करण्यात आल्या. या परीक्षा सुरू होऊन बरोबर एक महिना पूर्ण होत आहे. विद्यापीठाच्या सुमारे ९० टक्के परीक्षा संपल्या असून, आता केवळ कला व वाणिज्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी आहेत. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षांच्या निकालाची प्रक्रिया सुरू केली आहे.
विद्यापीठातर्फे सुमारे साडेपाच लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र, विज्ञान, औषधनिर्माण शास्त्र, विधी आदी अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर पदवीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या आहेत. तसेच परीक्षेदरम्यान काही तांत्रिक कारणांमुळे अडचण आलेल्या सुमारे चौदाशे विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या १६ मेनंतर घेण्याचे प्रस्तावित आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे म्हणाले की, विद्यापीठातर्फे ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना दरवर्षी सुमारे ८० ते ८५ टक्केच विद्यार्थी उपस्थित असतात. मात्र, विद्यापीठाकडून ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात असल्यामुळे उपस्थितीचे प्रमाण सरासरी ९५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. त्यामुळे ऑफलाइनपेक्षा ऑनलाईन परीक्षांना विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन परीक्षा घेत असताना प्रॉक्टरिंग केले जात आहे. सुमारे चारशे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देताना गैरप्रकार करत असल्याचे आढळून आले आहे.
--
विद्यापीठाने सुरू केलेल्या ऑनलाइन परीक्षांना १० मे रोजी बरोबर एक महिना पूर्ण होत आहे. विद्यापीठाच्या सुमारे ९० टक्के परीक्षा संपल्या असून केवळ कला व वाणिज्य अभ्यासक्रमाच्या परीक्षा आता उरल्या आहेत. विद्यापीठाने सर्व विषयांचे निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
- महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ