शिल्लक लस ४५ वर्षांच्या नागरिकांना प्राधान्याने द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:09 AM2021-05-28T04:09:28+5:302021-05-28T04:09:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शासनाने दुसरा डोस प्राधान्याने द्यावा अशा सूचना केल्या आहेत. त्यासाठी सध्या लस उपलब्ध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शासनाने दुसरा डोस प्राधान्याने द्यावा अशा सूचना केल्या आहेत. त्यासाठी सध्या लस उपलब्ध आहे. मात्र, अनेक केंद्रांवर दुसऱ्या डोसचे लाभार्थी संपून लस शिल्लक राहत आहे. यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस प्राधान्याने देण्याबाबत परवानगी मिळावी अशी, मागणी आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
कोरोना आणि म्युकरमायकोसिस उपचाराबाबत शासनस्तरावरून मार्गदर्शन व्हावे यासाठी सभापती प्रमोद काकडे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना पत्रव्यवहार केला असून, यात त्यांनी वरील मागणी केली. जिल्ह्यातील अनेक केंद्रांवरील नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. यामुळे त्या केंद्रांवर लस शिल्लक राहत आहे. ४५ वर्षांवरील अनेक नागरिक पहिल्या डोसपासून वंचित असल्याने त्यांना ही लस दिली जावी, याबाबत त्यांनी मागणी केली आहे.
खासगी दवाखान्यात लसीकरण सुरू आहे. मात्र, ही दवाखाने लसीसाठी वेगवेगळ्या शुल्काची आकारणी करत आहेत. एका दवाखान्यात एक तर दुसऱ्या दवाखान्यात एक यामुळे याबाबत शासनस्तरावरून एकच दरनिश्चित केला जावा. म्युकरमायकोसिसचे अॅम्पोटेरेसिन बी विक्रीवर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे. ते केवळ जिल्हा नियंत्रण कक्षाकडून मिळते. यामुळे इतर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. याबाबत शासन स्तरावर मार्गदर्शन करण्याच्याही सूचना काकडे यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
चौकट
महात्मा फुले जनधन योजनेत रुग्णालयांची संख्या वाढवा
म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचाराकरिता महात्मा फुले जनआरोग्य योजना ही मोजक्याच रुग्णालयात आहे. त्यामुळे अनेकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. परिणामी या योजनेअंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.
चौकट
परदेशात विद्यार्थी शिक्षणासाठी जात असतात. काही विद्यार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे. कोविशिल्ड लस घेतलेल्यांना दुसरा डोस हा ८४ दिवसांनी मिळणार आहे. मात्र, परदेशात जाण्यासाठी लसीकरण पूर्ण झाल्याचा दाखला असणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांत संभ्रमावस्था असल्याने याबाबतही स्पष्टता आणण्याची मागणी काकडे यांनी केली.