शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरणाला प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:16 AM2021-08-28T04:16:23+5:302021-08-28T04:16:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात सध्या तरी शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला नसला तरी पालक आणि संस्थाचालक यासाठी ...

Prefer vaccination of teachers, non-teaching staff | शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरणाला प्राधान्य द्या

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरणाला प्राधान्य द्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात सध्या तरी शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला नसला तरी पालक आणि संस्थाचालक यासाठी आग्रही आहेत. यामुळेच भविष्यात शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी पुणे जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील सर्व खासगी व सरकारी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. दरम्यान जगभरात दररोज पाच-सहा लाख नवीन कोरोना रुग्ण वाढत आहे. ही तिस-या लाटेची घंटा असू शकते, त्यामुळे नागरिकांना गर्दी करून तिस-या लाटेला आमंत्रण देऊ नका, असा इशाराही पवार यांनी दिला.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवार (दि.२७) रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात शहर आणि जिल्ह्याचा कोरोना आढावा घेण्यात आली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, संजय जगताप, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे उपस्थित होते.

पवार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवून देखील रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी झाला आहे. ही बाब चांगली असली तरी नागरिकांनी दहीहंडी, गणेशोत्सव सारख्या सणानिमित्त गर्दी करू नये. सणासुदीनिमित्त संसर्ग वाढू नये यांची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुणे विभागातील गणेशोत्सवानिमित्त काय उपाययोजना करण्याची गरज असल्याचे या संदर्भात विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पोलीस यंत्रणेसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, असे पवार यांनी सांगितले.

-------

सीएसआरमधून पुणे जिल्ह्याला दीड लाख डोस

गेल्या दीड-दोन महिन्यांत जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढला आहे. येत्या ३१ ऑगस्टला बजाज कंपनीकडून पुणे जिल्ह्यासाठी तब्बल १ लाख ३५ हजार कोरोना लसीचे डोस देण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुढाकार घेऊन सीएसआरमधून लसीकरण सुरू केले आहे. यामुळेच सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

------------------------

एसटी कर्मचा-यांनी टोकाचे पाऊल उचलू नये

पगार होत नसल्याने एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. याबाबत पवार यांनी सांगितले कोरोनामुळे एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी राज्य शासनाकडून सर्व मदत करण्यात येत आहे. शासनाने कर्मचा-यांचे पगार करण्यासाठी ५00 कोटी रुपये दिले आहेत. लवकरच आणखी निधी देण्यात येईल. पगार उशिरा होतील, पण नक्की होतील यामुळेच कोणी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Web Title: Prefer vaccination of teachers, non-teaching staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.