लसीचा दुसरा डोस देताना ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:11 AM2021-04-27T04:11:38+5:302021-04-27T04:11:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना प्रतिबंधक लस १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांना दिली जाणार असल्याने, ज्यांनी पहिला डोस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना प्रतिबंधक लस १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांना दिली जाणार असल्याने, ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांना दुसरा डोस घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल, अशी भीती सध्या निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीकरण करताना प्रथम दुसरा डोस देण्यास आरोग्य विभागाने प्राधान्य द्यावे़ तसेच दुसरा डोस देताना अन्य व्याधी असलेल्या व्यक्तींसह ज्येष्ठ नागरिकांना विशेष प्राधान्य द्यावे, अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनास दिल्या आहेत.
१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू होणार आहे. या लसीकरणाच्या नियोजनासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि़२६ एप्रिल) मनपा आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत मोहोळ यांनी ही माहिती दिली. या वेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते.
१ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणात दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्याबरोबर, शहरातील खासगी रुग्णालयांमधील लसीकरण केंद्रांना महापालिकेकडून लसपुरवठा केला जाणार नसल्याचेही मोहोळ यांनी सांगितले. १ मेपासून राज्य शासनाकडून महापालिकेला जो लस पुरवठा होईल तो केवळ महापालिकेच्याच लसीकरण केंद्रांमध्ये वितरित होणार आहे. याचा फायदा महापालिकेच्या लसीकरण केंद्रांना होणार असून, येथे अधिकाधिक प्रमाणात लस उपलब्ध होणार आहे.
महापालिकेकडून १८ वर्षांवरील लसीकरण सुरू करण्यासाठी नियोजन करण्याचे काम सुरू असून, लवकरच लसीकरण केंद्रेही वाढविली जाणार आहेत. लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे; परंतु दुसरा डोस घेणे बाकी आहेत, असे शहरात साधारणत: २ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. १५ हजार आरोग्य कर्मचारी, ४५ हजार फ्रंट लाईन वर्कर व अन्य व्याधी असलेले १७ हजार यांनाही अद्याप दुसरा डोस देणे बाकी आहे. त्यामुळे या सर्वांना प्राधान्याने लसीचा दुसरा डोस देण्यात येणार असल्याचेही महापौर यांनी सांगितले.
दरम्यान महापौर निधीतून वैकुंठ स्मशानभूमी येथे ३ व कैलास स्मशानभूमी येथे १ अशा चार विद्युत दाहिन्या बसविण्याबरोबरच, १०० व्हेंटिलेटर खरेदी करणे, नायडू येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणे आदी कामे केली जाणार असल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.
-------------------
चौकट :-
खासगी लसीकरण केंद्रांना थेट राज्याकडून पुरवठा
शहरातील ७३ खासगी लसीकरण केंद्रांना त्यांनी जेवढे पैसे जमा केले आहेत, त्यानुसार महापालिकेकडून पैसे भरल्याची पावती दाखवून लस वितरित केली जात होती. मात्र आता यापुढे थेट राज्याकडूनच या केंद्रांना लस वितरित होणार असल्याचे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून सांगितले गेले आहे.
------------------------------