सेकंडहॅण्ड मोटारीला पसंती
By admin | Published: November 20, 2014 04:28 AM2014-11-20T04:28:16+5:302014-11-20T04:28:16+5:30
घरासमोर एखादी मोटार असावी असे प्रत्येकालाच वाटते. नवी मोटार घेऊन मोठी रक्कम गुंतवून, ३ ते ५ वर्षे बॅँकेचे हप्ते फेडत बसण्यापेक्षा चकचकीत सेकंडहॅण्ड (जुनी) मोटार खरेदी करण्यास पसंती दिली
मिलिंद कांबळे, पिंपरी
घरासमोर एखादी मोटार असावी असे प्रत्येकालाच वाटते. नवी मोटार घेऊन मोठी रक्कम गुंतवून, ३ ते ५ वर्षे बॅँकेचे हप्ते फेडत बसण्यापेक्षा चकचकीत सेकंडहॅण्ड (जुनी) मोटार खरेदी करण्यास पसंती दिली जात
आहे. झपाट्याने वाढत असलेल्या पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत सेकंडहॅण्ड वाहनांच्या विक्रीचा आलेख उंचावत आहे.
घरात एखादी मोटार हवी हे आता सर्वसामान्य कुटुंबांनाही वाटू लागले आहे. मात्र, मोटारीच्या किमती भरमसाट आहेत. मोठी रक्कम अदा करुन आणि बॅँकेचे कर्ज काढून नवी मोटार खरेदी करता येते. मात्र, या रकमेची जमवाजमव करण्यात आर्थिक ओढाताण होते. कर्जाचे हप्ते आणि मोटारीचा दैनंदिन खर्च आणि देखभाल खर्च भागविण्यासाठी कसरत करावी लागते. कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडते.
मोठ्या रकमेच्या मोबदल्यात मोटार घेतल्यानंतर ती २ वर्षांनंतर बदलून दुसरी मोटार घेणारा एक वर्ग आहे. सतत नव्या मॉडेल्सचे मोटार वापरणारे नागरिक आहेत. मात्र, १० ते १२ लाखांची मोटार विक्री करताना त्याची किंमत थेट अर्धी होते. अर्ध्या किमतीमध्ये सेकंडहॅण्ड मोटार घेऊन त्याचा वापर करता येतो. २ ते ३ वर्षे वापरुन ती विकता येते.
आर्थिक कटीकटीपेक्षा सेकंडहॅण्ड मोटार खरेदीकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. साधारण २ ते ३ लाख रुपयांमध्ये मनपसंत गाडी घेता येते. नवा लूक आणि मॉडेलची वाहने असतात. विविध कंपन्यांचा चॉईस मिळत असल्याने योग्य दर्जाच्या गाडीला पसंती दिली आहे. पूर्वीचा डिझेल वाहनांकडील ओढा कमी झाला असून, पेट्रोल वाहनांना मागणी वाढली आहे. पेट्रोलच्या वाहनाला सीएनजी किट लावून घेता येते. यामुळे वाहन चालविणे अधिक किफायतशीर होते. शहरात सीएनजी पंपांची संख्या पुणे शहराच्या तुलनेत मोठी असल्याने नागरिकांना सीएनजी वाहनांकडे कल वाढत आहे. सेकंडहॅण्ड वाहने खरेदीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात ५० टक्क्यांपर्यत मोटारी सेकंडहॅण्ड असल्याचे सुत्रांनी सांगितले. शहरातील अनेक भागांत सेकंडहॅण्ड वाहनांचे शो- रुम दिसतात. ग्राहकांना उत्तम सेवा दिली जावी आणि विक्रेत्यांमध्ये समन्वय राहावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड मोटार डीलर असोसिएशनची नुकतीच स्थापना झाली आहे. सध्या शहरातील ३५ विक्रेते संघटनेचे सभासद आहेत.
शहरात दिवसाला किमान ५ वाहनांची विक्री होते. तेजीच्या काळात हे प्रमाण १० ते १५ वर जाते. भविष्य काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शहरात सुमारे १५० एजंट आहेत.