निकालामुळे पसंती ‘वर्क फ्रॉम होम’ला
By admin | Published: May 17, 2014 05:42 AM2014-05-17T05:42:11+5:302014-05-17T05:42:11+5:30
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता देशभर होती.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता देशभर होती. मतदानाच्या दिवशी सुट्टी असली तरी मतमोजणीला नसल्याने अनेक आयटी कंपन्यांच्या कर्मचार्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडला, तर काहींनी रीतसर सुट्टीही घेतली होती. देशभर सगळेच आज टीव्हीला चिकटून होते. ते यंदा सरकार कोणाचे येणार, कोण जिंकणार, आणि कोण हरणार, हे जाणून घेण्यासाठी. हा निवडणुकीचा उत्साह आज घराघरांत; तसेच प्रत्येक कार्यालयातही दिसून येत होता. अनेक ठिकाणी खास या दिवसासाठी कार्यालयात टीव्ही लावण्याची सोय केली होती, तर अन्यत्र लॅपटॉपवर ‘न्यूज अपडेट्स’ घेतले जात होते. महाराष्ट्राबाहेरून आलेल्यांनीही आपल्या भागात कोण विजयी होत आहे, हे जाणून घेत जणू आनंदोत्सवच साजरा केला. सिनिक्रॉन कंपनीतील सॉफ्टवेअर लीड इंजिनिअर निर्भय आनंद म्हणाले, ‘आज मी आॅफिसला आलो, त्या वेळी अत्यंत कमी लोक आॅफिसमध्ये होते. नंतर समजले, की काही लोक घरून काम करत आहेत, तर काहींनी चक्क सुट्टीच घेतली आहे. आम्हीही सगळेच दिवसभर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांच्या वेबसाईट सुरू करून निकालाकडे नजर लावून बसलो होतो.’ ‘मी बिहारमधील आहे. तेथील निकाल जाणून घेण्याची मला फार उत्सुकता होती. त्याबरोबरच महाराष्ट्रातील निकालही फारच रोमांचक लागला.’ इन्फोसिस कंपनीतील तंत्रज्ञ अभियंता अमिताभ श्रीवास्तव कामानिमित्त मुंबईला गेले होते. ते म्हणाले, ‘काम कितीही असले तरी नजर निकालाकडेच लागली होती. मोबाईलवर निकाल तपासत होतो. तसेच, चहा किंवा जेवणासाठी ब्रेक घेतला, की त्या वेळीही फक्त निकालावरच चर्चा सुरू होती.’