लसीकरणाला गरोदर मातांचा अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:09 AM2021-07-10T04:09:08+5:302021-07-10T04:09:08+5:30
पुणे : जिल्ह्यात शुक्रवारी गरोदर मातांच्या लसीकरणाला सुरूवात झाली. मात्र, या मोहिमेला पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला. आंबेगाव तालुक्यात ...
पुणे : जिल्ह्यात शुक्रवारी गरोदर मातांच्या लसीकरणाला सुरूवात झाली. मात्र, या मोहिमेला पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला. आंबेगाव तालुक्यात १, दौंड तालुक्यात १६, पुरंदर तालुक्यात ५ तर खडकी कॅन्टोमेंन्ट बोर्डात ९ गरोदर महिलांनी लसीकरण करून घेतले. बाळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त गरोदर मातांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा व कोरोनापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले आहे.
कोविडबाधित गरोदर महिलांमध्ये प्रसूती काळ पूर्ण होण्याआधी प्रसूती होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे गरोदरपणातील इतर संभाव्य धोके व नवजात बालकांना इजा होण्याचे प्रमाण अधिक आढळून येऊ शकते.
बहुतेक सर्व कोरोनाबाधित गरोदर महिलांना सुरुवातीला जरी सौम्य प्रकारची लक्षणे असली तरी, त्यांची तब्येत अचानक ढासळू शकते व त्यामुळे बाळ दगावण्याचा धोका उत्पन्न होऊ शकतो. लसीकरणामुळे होणारे फायदे हे कोरोनामुळे होणाऱ्या तोट्याच्या तुलनेने अधिक असतील. अशावेळी जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर महिलांना कोविड लसीकरण करण्याबद्दल मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या होत्या. कोविड संसर्गाचा जास्त धोका असणाऱ्या किंवा सहव्याधी असणाऱ्या गरोदर महिलांमध्ये तीव्र संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. यामुळे जिल्ह्यात ही लसीकरण मोहीम शुक्रवारपासून राबविण्यास सुरवात झाली असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सचिन येडके यांनी सांगितले. पहिल्या दिवशी केवळ ३१ महिलांनी लस टोचून घेतली. बाळाच्या आणि आईच्या जिवाच्या दृष्टीने गरोदर मातांनी प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी येडके यांनी केले आहे.